अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात न्यायालयात हजर राहण्यापासून अणर्र्व गोस्वामींना सूट

March 06,2021

मुंबई, 6 मार्च : वास्तूविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमूद नाईक यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणातील खटल्यासाठी अलिबाग न्यायदंडाधिकारी न्यायालयात प्रत्यक्ष हजेरी लावण्याविषयी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालाने तुर्तास सूट दिली आहे. या प्रकरणात एफआयआरला आव्हान देणार्‍या याचिकेवरील सुनावणी 16 एप्रिलला ठेवून न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने तोपर्यंत गोस्वामींना अलिबाग न्यायालयातील प्रत्यक्ष हजेरीविषयी सूट दिली.

अलिबाग पोलिसांनी या प्रकरणात गोस्वामींबरोबरच अन्य दोघा व्यावसायिकांविरोधात तब्बल 1900 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यालाही गोस्वामींनी याचिकेत दुरुस्ती करुन आव्हान दिले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे याविषयी सुनावणी झाली. तेव्हा, मूळ याचिकेत आम्ही एक अर्ज केला आहे. अलिबाग न्यायालयाने गोस्वामी यांना 10 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. परंतु उच्च न्यायालयातील याचिका प्रलंबित आहे आणि कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता तुर्तास त्या न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी, अशी विनंती आम्ही अर्जात केली आहे. असे गोस्वामीचे वकील अ‍ॅड. संजोग परब यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही मूळ याचिका 16 एप्रिलला सुनावणीसाठी ठेवत आहोत, असे सांगून खंडपीठाने सांगितले.