देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दमकोंडवारचा महापौरांच्या हस्ते सत्कार

March 05,2021

नागपूर : ५ मार्च - चीन येथे होणाऱ्या विश्व विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झालेल्या हर्षदा दमकोंडावार ह्या खेळाडूचा महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात खेळाडूंसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहेत. नागपुरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, हा त्यामागचा हेतू आहे. खेळाडूंनी सुद्धा या पोषक वातावरणाचा लाभ घेतला. हर्षदासारखे खेळाडू जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने उत्तुंग भरारी मारतात. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य आम्ही करीत असतो. नागपूरचा मान वाढविल्याबद्दल मनपातर्फे तिचा सत्कार करणे, हे आमचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

महापौर कक्षात झालेल्या सत्कार कार्यक्रमाला हर्षदा दमकोंडावार हिचे प्रशिक्षक राहुल मांडवकर, मनपाचे क्रीडा सभापती प्रमोद तभाने, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर उपस्थित होते. महापौरांनी सत्कार केल्यानंतर उपस्थित सर्वांनी तिला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.