घ्या समजून राजेहो - पूजा चव्हाण मृत्यूची सखोल चौकशी व्हायलाच हवी

February 26,2021

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी बंजारा समाजातील एक तरुणी पूजा चव्हाण हीचा पुण्यात झालेला संशयास्पद मृत्यू सध्या महाराष्ट्रात प्रचंड गाजतांना दिसतो आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात राज्यमंत्रिमंडळातील एक मंत्री असलेले बंजारा समाजातील शिवसेना नेते संजय राठोड त्यांचे नाव गोवले गेलेले असल्यामुळे या प्रकरणात प्रचंड राजकारण सुरु झालेले दिसते आहे.
पूजा चव्हाण ही बंजारा समाजातील एक होतकरू तरुणी होती एक सामाजिक कार्यकर्ती आणि त्याचबरोबर एक उभरती कलावंत  म्हणून ती ओळखली जात होती. मॉडेलिंगचे ती प्रशिक्षण घेत होती. त्याचसाठी आपले परळी वैजनाथ हे मूळ गाव सोडून  ती पुण्यात येऊन एका नातेवाईकांसोबत राहत होती. ज्या फ्लॅटवर ती राहत होती त्याच फ्लॅटच्या बाल्कनीतून ती खाली कोसळली  आणि त्यातच तिचा मृत्यू झाला मृत्यूसमयी तिने मद्यप्राशन केले असावे असे पोस्टमार्टम अहवालात म्हटले गेल्याची माहिती  आहे आता तिने आत्महत्या केली की दारूच्या नशेत तिचा अपघात झाला की कुणीतरी तिला ढकलून मारले  याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे तिच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या तिच्या  संदर्भातील फोनकॉलच्या ध्वनिफिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. त्यापाठोपाठ तिचे संजय राठोड  यांच्यासोबतचे फोटोही व्हायरल केले गेले त्यामुळे एकूणच घटनाक्रमाबद्दल संशय वाढीला लागला. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या  भारतीय जनता पक्षाने या मृत्यूमध्ये संजय राठोड यांचा हात असल्याचा आरोप केला असून  त्यांच्यावर  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरलेली आहे.
अनेकदा अशी दुर्घटना घडली की त्या घटनेत सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न सर्वच हितसंबंधी करत असतात. या प्रकरणात  देखील शिवसेना विरोधकांनी असाच प्रयत्न सुरु केला मात्र त्याला तत्काळ उत्तर देणे संजय राठोड यांना सहज शक्य होते.  काही दिवसांपूर्वी राज्यमंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही काही आरोप झाले होते. मात्र  त्यावेळी मुंडे यांनी ताबडतोब समोर येऊन आपली बाजू मांडली  होती.  ती खरी की खोटी यावर वाद होऊ शकतात मात्र  ते वास्तवाला सामोरे गेले हा मुद्दा नाकारता येत नाही संजय राठोड या प्रकरणात अगदी विपरीत वागले घटना घडल्यापासून ते  जवळजवळ भूमिगत झाले असेच म्हणता येईल सुमारे १५ दिवस ते आपल्या मुंबईच्या सरकारी बंगल्यावर किंवा  यवतमाळच्या घरी उपलब्ध नव्हते या दरम्यान ते मोबाईलवरही नॉट रिचेबल होते. मंत्रालयातील कार्यालयातही त्यांचा  ठावठिकाणा दिला जात नव्हता त्यामुळे संशयात अधिकच भर पडली सुमारे १५ दिवसांनंतर ते शक्तिप्रदर्शन करत  पोहरादेवीच्या मंदिरात  उपस्थित झाले. साहजिकच ते काय बोलतात याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष होते. मात्र इथेही उडवाउडवीची उत्तरे  देऊन ते मोकळे झाले इतकेच काय तर त्यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनीही हे प्रकरण झाकण्याचाच  प्रयत्न केला.  
सर्वसाधारणपणे अशी घटना घडल्यावर मृतक व्यक्तीचे नातेवाईक हे अतिशय आक्रमक असतात या प्रकरणात पूजाचे आईवडील मात्र  कुठेतरी दबावात असल्याचे जाणवत होते. नंतर तिची चुलत आजी बोलल्यावर कुठेतरी या मृत्यूबद्दल निकटवर्तीयांकडून संशय व्यक्त होतो आहे असे दिसून आले. हे सर्व प्रकार बघता घटना घडल्याबरोबर पूजाच्या कुटुंबियांवर कुणीतरी  दबाव तर टाकला नाही ना अशी वारंवार शंका येत होती. त्यातच ज्या अरुण राठोडच्या फ्लॅटवर पूजा  मुक्कामी होती त्याचेही परस्पर विरोधी विधाने संशय वाढवणारीच होती  दरम्यान यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये  एका  पूजा अरुण राठोड नामक तरुणीचा गर्भपात केला गेल्याचीही चर्चा सुरु होती. यामुळे तर संशय अधिकच वाढला.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरते आहे अशी वारंवार शंका घेतली जात होती. मात्र मृत्यूनंतर १५ दिवस उलटले  तरी गुन्हा नोंदला गेला नव्हता यामुळेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आजही विरोधकांकडून  लावून धरली गेली आहे. सोमवारपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होते आहे त्यातही या मुद्द्यावर  विरोधक सरकारला धारेवर धरतील हे निश्चित आहे.  
१५ दिवस भूमिगत असलेले संजय राठोड २ दिवसांपूर्वी पोहरादेवीला प्रकट झाले पोहरादेवी हे बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र आहे.  त्यामुळे संजय राठोड यांनी आपल्यावर संकट आले असताना तीर्थस्थानाचा आधार घेणे आणि तिथल्या देवतेला साकडे घालणे  यात गैर काहीही नाही मात्र त्यावेळी केलेले शक्तिप्रदर्शन अनाठायी होते. आदल्याच दिवशी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री  उद्धवपंत  ठाकरे यांनी कोरोनाची लाट वाढत असल्यामुळे राज्यातील जनतेने कोरोनाचे नियम पाळावे  असे आवाहन केले होते. त्याला पोहरादेवीत पुरता हरताळ फासला गेला पोहरादेवीत संजय राठोड यांच्या समर्थनार्थ  हजारो लोक गोळा झाले होते त्यांनी तोंडाला मास्क बांधणे सोशल डिस्टंसिंग हे सर्व प्रकार गुंडाळून ठेवले होते. एकूणच या प्रकारातून  माझे बंजारा समाजात काय स्थान आहे हे दाखवून माझ्यावर कारवाई करताना विचार करा असा इशाराच  संजय राठोड उद्धव ठाकरेंना देत आहेत असे या सर्व घटनाक्रमातून जाणवत होते. वस्तुतः अशा प्रकारे गर्दी होणे हे अपेक्षितच होते त्यामुळे  उद्धव ठाकरे यांनी आधीच वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षकांना सांगून पोहरादेवीत संचारबंदी लावणे  गरजेचे होते. मात्र उद्धव ठाकरेंनी तसे केले नाही आता वरातीमागून घोडे आणत त्यांनी जमावावर आणि आयोजकांवर  गुन्हे दाखल केले मात्र ज्या संजय राठोडांमुळे हे घडले त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही हे बघता माझ्या शिवसैनिकांचा  किती जनाधार आहे ते बघा आणि त्याच्यावर कारवाईचा आग्रह धरू नका असा इशारा उद्धवपंतांनी तर राज्यातील  जनतेला आणि विरोधकांना दिला नाही ना अशी शंकाही घेता येते.  
या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत. ते खरे की खोटे हे चौकशीनंतरच समोर येईल अशा वेळी  त्यांच्या समर्थनार्थ अशा प्रकारे शक्तिप्रदर्शन घडवणे कितपत योग्य आहे याचाही विचार व्हायला हवा काही दिवसांपूर्वी  मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप झाले होते नंतर तक्रारकर्तीने आरोप मागे घेतले त्यांचेही अशाच  पद्धतीने त्याच्या गावी स्वागत करण्यात आले होते. एकूणच हा राजकीय झुंडशाहीचा प्रकार की गुन्हेगारीचे उदात्तीकरण  याचा विचार करणे आज गरजेचे झाले आहे.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता पूजा चव्हाण प्रकरणात सखोल चौकशी होणे गरजेचे आहे ही चौकशी सुरु असताना संजय राठोड मंत्रिपदावर  असणे हे देखील चुकीचेच ठरेल त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना पदावरून तात्पुरते का होईना पण दूर करणे  गरजेचे आहे मात्र इथे मतांचे राजकारण निश्चितच आडवे येईन त्यामुळे उद्धवपंत त्यांना पदावरून हटवणार नाहीत  हे  आजतरी स्पष्ट दिसते आहे.
इथे आज बाळासाहेब ठाकऱ्यांची आठवण येते युतीच्या काळात ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांना बाळासाहेबांनी तत्काळ बाजूला केले होते  शशिकांत सुतार, बबन घोलप, या मंत्र्यांना त्यांनी घरी बसवले होते. बाळासाहेबांचीच  पद्धती उद्धवपंतांनी स्वीकारणे  अपेक्षित आहे. मात्र सध्या ते जाणता राजा असलेल्या शरद पवारांच्या तालावर नाचताहेत त्यामुळे ते  असे काहीच करणार नाही हे निश्चित.
त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या विश्वासार्हतेवर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. ज्या शिवाजी राज्यांच्या नावे  महाराष्ट्रात सरकार चालवले जाते त्यांच्या आदर्शांनाही धक्का राहणार आहे. याचा विचार उद्धवपंत आणि शरदराव  यांनी करायला हवा.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....

ता.क. :  घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.