मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी; औरंगाबादेत उपचारादरम्यान ५२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

April 05,2020

औरंगाबाद शहरातील पाच जणांचे कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. यातील एक ५२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी दिली.

सदर रुग्णावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. आजच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब होता, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. घाटी रुग्णालयात सिव्हिटीएस इमारतीत शुक्रवारपासून उपचार घेत असलेल्या दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हिमायतनगर ७९ वर्षीय आणि सातारा परिसरातील ५२ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. यातील ५२ वर्षाच्या रुगणाचा मृत्यू झाला. औरंगाबादेत कोरोनाने पहिला बळी गेला.

जिल्हा रुग्णालयात दाखल दोन कोरोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे घाटी प्रयोगशाळेने संकेत शनिवारी रात्री उशिरा दिले होते. या दोघांत आरेफ कॉलनीतील एका ४५ वर्षीय महिलेचा आणि बीड बायपास परिसरातील एका ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामुळे या दोघांवर पॉझिटिव्ह रुग्णांवर केले जाणारे उपचार सुरू करण्यात होते. या दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर खाजगी रुग्णालयात दाखल सात वर्षाची मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.