सुरक्षा उपकरणे न मिळाल्याने डॉक्टरांचा कामावर बहिष्कार

April 05,2020

नागपूर, 5 एप्रिल -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात भीषण रुप धारण करत असतानाच उत्तरप्रदेशातून मात्र धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. बांदामध्ये नर्स आणि मेडिकल स्टाफने वेतन आणि सुरक्षा उपकरणांची मागणी  करत कामावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वढेरा यांनी डॉक्टरांची हीच मागणी उचलून धरत योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रियंका वढेरा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला  आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओसोबत त्यांनी योगी सरकार डॉक्टरांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे. यावेळेस आरोग्य कर्मचार्‍यांच्या सहकार्याची सर्वात जास्त गरज आहे. तेच जीवनदाता आहेत आणि एखाद्या  योद्धाप्रमाणे मैदानात लढत आहेत. परंतु, बांदामध्ये मात्र नर्स आणि मेडिकल स्टाफला सुरक्षा उपकरणे न देता उलट त्यांचे वेतन कपात करून मोठा अन्याय सुरु केला आहे. असे प्रियंका

यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यासाठी प्रियंका गांधी यांनी योगी सरकारला जबाबदार धरले आहे, मी उत्तरप्रदेश सरकारला विनंती करतेय की ही वेळ योद्यांसोबत अन्याय करण्याची नाही तर त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रियंका यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत एक महिला डॉक्टर बांदा राजकीय मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल स्टाफने कामावर बहिष्कार टाकल्याचे सांगताना दिसत आहे. कर्मचार्‍यांची ड्युटी आयसोलेशन वॉर्डमध्ये लावण्यात आलेली  आहे. पण यासाठी त्यांना कोणतेही सुरक्षा किट, मास्क किंवा सॅनिटायझर देण्यात आलेले नाही. इतकेच नाही तर या महिन्यात त्यांच्या वेतनातही कपात करण्यात आल्याचे या महिला डॉक्टरने या व्डिडिओत म्हटलेले दिसते.