गरीबांना दोन वेळचे भोजन पोहचवणारी रोटी बँक

April 05,2020

नागपूर, 5 एप्रिल -  जगात सर्वात पुण्याचे काम कुठले असेल तर ते भुकेल्यांना अन्न देणे. अन्नदानासारखे पुण्य नाही, असे म्हणतात. त्यातही दान म्हटले की त्याग आला यातले दानही काढून टाकले तर समर्पित वृत्तीने गरीब, गरजूंना मदत  करण्याचे कर्तव्य तेवढे ठरते आणि त्यातून समाधान मिळते. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील गरीब, असहाय्य, गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचविणारे असे अनेक देवदूत सध्या कुठल्याही प्रसिद्धीशिवाय समर्पितपणे काम करीत  आहेत. रोटी बँक फाऊंडेशन ही संघटनाही त्याच पद्धतीने सध्या गरीबांच्या पोटापाण्याची सोय लावण्यात व्यस्त झालेली दिसत आहे.

रोटी बँक ही संस्था नागपूरकरांसाठी नवी नाही. जिथे गरज आहे, कुणी उपाशी आहे, गरीब आहे असहाय्य आहे. तेथे रोटी बँक फाऊंडेशन निःशुल्क अन्न घेऊन तयार असते. या कार्यकर्त्यांना काहीही नको. पोच भरल्यावर गरीब लोकांच्या चेहर्‍यावर येणारे समाधान हीच या कार्यकर्त्यांची ऊर्जा आहे. मुळात रोटी बँक फाऊंडेशन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणार्‍या रुग्णांच्या गरीब नातेवाईकांच्या भोजनाची सोय करते. सिम्स हॉस्पिटलमध्येही रुग्णांच्या असहाय्य नातेवाईकांना भोजन देण्यासाठी ही संस्था कार्य करते. पण कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर ही संस्था आता नागपूरच्या आजूबाजूच्या गावातही कार्य करीत आहे. अनेक लोक बाहेरगावहून रोजागारासाठी औद्योगिक क्षेत्रात, विविध  कंपन्यांममध्ये कामाला आहेत. लॉकडाऊनमुळे ते गावी परतू शकले नाहीत. हातात पैसा नाही आणि घरात अन्नधान्य नाही. त्यांचे कच्चेबच्चेही यामुळे उपासमारीच्या संकटात येण्याचा धोका होता. पण औद्योगिक क्षेत्रात अडकलेल्या या  कामगारांच्या कुटुंबियासाठी रोटी फाऊंडेशन धावून गेले आहे. त्यामुळेच नागपुरात अडकलेल्या या कामगारांची त्यांच्या कुटुंबांची भूक भागविणारे रोटी फाऊंडेशनचे कार्यकर्ते या कामगारांसाठी देवदूतच ठरले आहेत. काहीच करता येणे  शक्य नाही. अशा कठीण वेळी किमान दोनवेळ पोटाची खळगी भरण्याचे काम हे देवदूत करीत आहेत. यासाठी हे देवदूत कुठलेच शुल्क आकारत नाहीत. खरे तर बुटीबोरी, टाकळघाट, एमआयडीसी परिसरात नागपुरातून अन्न घेऊन  जाणेे, वितरण करणे हे कठीण काम आहे. पण कामगारांच्या चेहर्‍यावर उमटणारे समाधान आणि कर्तव्यपूर्तीचा आनंद हीच या कार्यकर्त्यांच्या जीवनाची ऊर्जा आहे. यासाठी गजानन मंदिर, सिव्हिल लाईन्स, साई मंदिर, कामठी मार्ग आणि  देवी अहिल्या मंदिर, धंतोली येथे अन्न शिजविले जाते. त्यानंतर संमस्थेच्या व्हॅनमध्ये टाकून हे अन्न नागपूर बाहेर अडकलेल्या बाहेरगावच्या गरजू कामगार, मजूरांना वितरित केले जाते.

निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. पुरुषोत्तम चौधरी यांच्या संकल्पनेतून या संस्थेची स्थापना झाली. प्रारंभी मुंबईतील रस्त्यावर राहणार्‍या गरजूंना अन्न देण्याचे काम करण्यात आले. आजही हे काम सुरू आहे. त्यानंतर नागपुरातही रुग्णालयातील रुग्णांच्या गरजू नातेवाईकांना भोज देण्याचे काम संस्थेने सुरु केले. सध्या मात्र कोरोना विषाणुमुळे सर्वाधिक गरज बाहेरगावातील कामगार, मजूरांचा असल्याने नागपूर परिसरातील गरजूंपर्यंत अन्न पोहचविण्याचे कार्य   करण्यात येत आहे.