प्रदूषणमुक्तीसाठी ४ हजार किलोमीटर सायकल प्रवास करणाऱ्या नामदेव राऊत यांचे चंद्रपुरात स्वागत

February 22,2021

चंद्रपूर : २२ फेब्रुवारी - चंद्रपूर येथील महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव राऊत यांनी प्रदुषणमुक्तीसाठी २६ दिवसात तब्बल ४ हजार किलोमिटरचा सायकल प्रवास केला. त्यांचे आज  चंद्रपूर महानगरात आगमन झाले. जिल्ह्यात पोहचताच भद्रावती येथे, तर चंद्रपूर महानगरात वडगाव, जटपुरा गेट व महानगरपालिका पालिकेसमोर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भद्रावती येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी, तर कुणबी समाजाच्या वतीने विजय सातपुते यांनी स्वागत केले. वडगाव येथे हरी येरगुडे यांनी, तर महानगरपालिकेसमोर मनपाच्या महापौर राखी कंचर्लावार, रवी आसवानी, वसंत देशमुख, संजय कंचर्लावार, छबू वैरागडे यांनी स्वागत केले. 

राऊत यांनी गुजरात येथील द्वारका येथून सायकल प्रवासाला सुरूवात केली. द्वारका, जामनगर, चित्रोड, पाटण, राजस्थान, माउंट अबू, उदयपुर, अजमेर, जयपूर, दौसा, उत्तरप्रदेश, आग्रा, सौरिख, लखनऊ, अयोध्या, बस्ती, बिहार, गोपाल गंज, फर्वेसगांज, पश्चिम बंगाल, सिलीगुडी, मालबाजर, अलीपुरदुर, आसाम, बारामा, रांगिया, बरसोला, तेजपुर, गोहपुर असा प्रवास करून ते अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे पोहोचले होते. राऊत यांचा ठिकठिणी सत्कार करण्यात आला. त्यांनी सहा राज्यातून प्रवास करत झाडे लावा, झाडे जगवा, प्रदुषण मुक्त भारताचा संदेश दिला. चंद्रपूर शहर महानगरपालिकेत अतिक्रमण विभागातून सेवानिवृत्त झालेले नामदेव राऊत क्रीडा प्रशिक्षक आहेत. त्यांना सायकल चालविण्याचा छंद आहे. या सायकलपटूचे कौतुक होत आहे. त्यांच्यासोबत मार्गदर्शक म्हणून संजय बारवे, अतुल तपासे, तर सहकारी संदीप वैद्य, श्रीकांत ऊके, प्रसाद देशपांडे आदींची उपस्थिती होती.