भररस्त्यात पत्नीवर चाकूहल्ला करून जीव घेण्याचा केला प्रयत्न, आरोपी अटकेत

February 22,2021

नागपूर : २२ फेब्रुवारी - कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीला रस्त्यात गाठून तिच्यावर चाकूने हल्ला करीत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार्या पतीला बजाजनगर पोलिसांनी अटक केली. इशिका विलास उईके (२०) रा. लक्ष्मीनगर झोपडपट्टी असे जखमी महिलेचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी इशिकाचे राजीवनगर, एमआयडीसी येथे राहणार्या आरोपी सूर्यकांत दूरसिंग शाहू (३०) याच्याशी लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर इशिकाचे अन्य तरुणासोबत प्रेमसंबंध होते. सूर्यकांत तिला रंगेहात पकडले होते. त्यावरून त्यांच्यात वाद होत असे. याच कारणावरून सहा महिन्यांपासून इशिका सूर्यकांतपासून वेगळी झाली होती आणि ती आपल्या माहेरी निघून गेली. एक महिन्यांपूर्वी तिने लक्ष्मीनगर झोपडपट्टी येथे वेगळी खोली घेऊन ती ज्योत्सना नावाच्या मैत्रिणीसह राहत होती. दोघ्याही लक्ष्मीनगर येथील एका हॉटेलमध्ये हेल्पर म्हणून कामाला होत्या. 

रविवारी दुपारी सूर्यकांतने ज्योत्सनाच्या फोनवर फोन करून तो इशिकासोबत बोलला. त्यावेळी इशिकाने आता मला तुझ्यासोबत नांदायचे असून येत्या दोन तीन महिन्यात मी दुसर्यासोबत लग्न करणार आहे असे सूर्यकांतला ठणकावून सांगितले. त्यामुळे सूर्यकांत संतप्त झाला होता. रविवारी रात्री ११.१५ च्या सुमारास हॉटेलमधील काम संपवून इशिका ही तिच्या मैत्रिणीसोबत जात होती. त्याचवेळी मागाहून सूर्यकांत आला असता ती थांबली. ‘दुपारी तू मला दुसर्या लग्नाविषयी का बोलली असे बोलून खिशातून चाकू काढून इशिकावर उगारला. आरडाओरड झाल्याने हॉटेलचे लोक धाऊन आले असता इशिकाने पळ काढला. सूर्यकांत तिच्या मागे धावला. तिला पकडून खाली पाडले आणि चाकूने तिच्या गालावर, हातावर, हनुवटीवर, पाठीवर वार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी ३०७ कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपी सूर्यकांत यास अटक केली.