बुलढाणा जिल्ह्यातही लावले कडक निर्बंध

February 22,2021

बुलडाणा : २२ फेब्रुवारी - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असताना आता बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर आणि चिखलीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे.

22 फेब्रुवारी म्हणजे सोमवारपासून ते 1 मार्च दरम्यान नवे आदेश लागू राहणार आहेत. त्यात रात्री 8 वाजेपासून ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान किराणा, भाजीपाला आणि पिठाची गिरणी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. इतकच नाही तर प्रतिबंधित क्षेत्रातील औषध दुकानंही सकाळी 8 ते दुपारी 3 यावेळेतच सुरु राहणार आहेत. तर दूध विक्रेत्यांना सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते रात्री 8.30 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर आणि चिखली या पाचही नगर पालिकांसाठी हा आदेश लागू असणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यात सध्या संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या संपूर्ण परिस्थितीत ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत; त्या कोव्हिड सेंटर्सची दुरवस्था झाली आहे. कोव्हिड सेंटर्समध्ये प्रचंड अस्वच्छता झाली आहे. येथे वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत असून यामध्ये बॉटल्स इंजक्शन्स, सलाईन यांना उघड्यावर टाकण्यात येत आहे. या प्रकारामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोना रुग्ण वाढल्यामुळे बुलडाणा शहरातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश येथील प्रशासनाने दिले आहेत. या आदेशानुसार आजचा आठवडी बाजार बंद होता. बाजारातील सर्व दुकाने, भाजी मंडई, पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.