देशात 211 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित सापडले

April 05,2020

नागपूर, 5 एप्रिल -  कोरोेनाचा प्रसार रोखणे प्रशासनासाठी आता अत्यंत आव्हानात्मक होत चालले आहे. कारण, ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, नुकतेच वाशिम जिल्ह्यातही एक रुग्ण आढळला. कोरोनाने आतापर्यंत  देशातील 30 टक्के जिल्ह्यांमध्ये पाय पसरले आहेत. केेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील 720 पैकी 211 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित आढळले आहेत. काही मोठ्या राज्यातील 60 टक्के जिल्ह्यांमध्ये हा प्रसार झाला आहे,  तर छोट्या राज्यांमध्ये 30 टक्के प्रसार झाला आहे.

दरम्यान, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण आरोग्य मंत्रालयाने पहिल्या 1865 रुग्णांच्या आधारावर ही माहिती दिली आहे. आता एकूण रुग्ण 2902 झाले आहेत. जाणकारांच्या मते, कोरोनाचा हा वेगाने होणारा प्रसार प्रशासनावर ताण वाढवू शकतो. कारण, टेस्टिंग किट, वैद्यकीय सेवा यांचा अगोदरच तुटवडा आहे. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 62 टक्के म्हणजे 37 पैकी 23 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. तर महाराष्ट्रात 52 टक्के जिल्ह्यांमध्ये म्हणजेच 36 पैकी 19 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दिल्ली आणि केरळ या दोन राज्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण आढळले आहेत.