घ्या समजून राजे हो - 10 मिनिटे दिवे बंद केल्याने वीज निर्मिती बंद पडेल हा दावा हास्यास्पद

April 04,2020

10 मिनिटे दिवे बंद केल्याने वीज निर्मिती बंद पडेल हा दावा हास्यास्पद काल सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून दिलेल्या संदेशात रविवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी रात्री 9 वा. 9 मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून मेणबत्ती किंवा टॉर्चने प्रकाश पाडण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन प्रसारित होताच मोदी विरोधक आणि मोदी समर्थक या दोघांनाही एकदमच जोर चढला आणि विविध तर्क लढवणे सुरु झाले आहे.

मोदी समर्थकांनी अशा प्रकारे दीपप्रज्वलन करून निर्माण होणारी ऊर्जा आणि त्यामुळे नष्ट होणारे जीवाणू हा एक तर्क लढवला आहे. काही मोदी समर्थकांनी ग्रहतारे आणि ज्योतिष्य याचे आधार घेत विविध तर्क लढवले आहेत. हे तर्क बरोबर किंवा चूक या वादात सध्या मी जाणार नाही. मात्र या कृतीतून संपूर्ण्र देशाला एका सूत्रात बांधून देशवासियांमध्ये मानसिक ऊर्जा निर्माण करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे हे मात्र मान्य करावे लागेल. शेवटी स्वातंत्र्यपूर्व काळात मूठभर मीठ उचलून काही इंग्रज पळून जाणार नव्हते मात्र त्यातून देशवासियांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा महात्मा गांधींचा प्रयत्न आजही जगभरात ऐतिहासिक प्रयोग म्हणून प्रसिद्ध आहेच ना.

मोदी विरोधकांनीही आपले विविध तर्क मांडले. काहींनी मोदी ईव्हेन्ट करीत आहेत असा आरोप केला. काहींना मोदींनी पुढे निर्माण होणारी आर्थिक मंदी आणि त्यावरील उपाय, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि त्यावरील उपाय, मजुरांचे स्थलांतर अशा विविध मुद्यांवर भाष्य करावे अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्यांचा तळतळाट होता.

या सर्व प्रकारांमध्ये काही विद्वानांनी मात्र 10 मिनिटे घरातील दिवे बंद केले तर त्याचा परिणाम विजेची मागणी घसरण्यात आणि परिणामी जनरेटरवर दाब वाढून पूर्ण विद्युत प्रवाह बंद पडण्यात होईल असा तर्क लावला. या कथित तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारे महाराष्ट्रात विद्युत निर्मिती बंद पडली तर पुन्हा निर्मिती सुरु करण्यासाठी 16 तासांचा वेळ लागेल आणि त्याकाळात संपूर्ण राज्याची व्यवस्था कोलमडेल असा दावा केला. त्या पाठोपाठ याचा परिणाम नॅशनल ग्रीडवर होऊन देशभरातीलही विद्युत पुरवठ्याची व्यवस्था कोलमडेल असेही सांगितले गेले. सर्वसामान्य नागरिकांनी असा दावा केला त्यात काही विशेष नाही. मात्र महाराष्ट्राचे सुविद्य ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनीही असा दावा केल्याचे पाहून माझ्यासारखा विचार करणारा माणूस चिंतीत झाला.

या चिंतेतूनच मी विद्युत निर्मिती आणि विद्युत पारेषण तसेच वितरण क्षेत्रातील काही जाणकारांशी संपर्क साधला. या जाणकारांकडून मिळालेली माहिती मी आपल्यासाठी या लेखात उपलब्ध करून देत आहे.महाराष्ट्राचा विचार करता ज्यावेळी पूर्ण औद्योगिक उत्पादन आणि सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने कार्यरत असतात त्यावेळी महाराष्ट्राची विजेची सर्वोच्च गरज ही 23 हजार मेगावॅट इतकी असते. या सर्वोच्च गरजेच्या वेळेला तांत्रिक भाषेत पीक अवर असे म्हटले जाते. महाराष्ट्रात हा पीक अवर सर्वसाधारणपणे संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळात असतो.

सध्या औद्योगिक प्रतिष्ठाने आणि व्यवसाय हे बंद आहेत. त्यामुळे सहाजिकच महाराष्ट्राची विजेची गरज 23 हजार मेगावॅटवरून 13 हजार मेगावॅटवर आलेली आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी विद्युत निर्मिती करणारे सर्व संच आणि नॅशनल ग्रीडमधून मिळणारी वीज यातून पूर्ण राज्याची गरज भागवली जाते. सध्या 10 हजार मेगावॅट विजेची मागणी कमी झाल्यामुळे राज्य विद्युत मंडळाने आधीच काही निर्मिती संचांमधून विद्युत निर्मिती बंद केली असून त्या संचाची देखभाल सुरु केली आहे. त्यामुळे वीज निर्मिती अपसूकच कमी झाली आहे आणि ज्या संचांमधून वीज निर्मिती होते त्यांची पूर्ण क्षमता वापरली जाते आहे.

सद्यस्थितीत 13 हजार मेगावॅटची गरज ही पीक अवरची म्हणजेच सायंकाळी 7.30 ची आहे. 5 एप्रिलला रविवार असल्याने ही गरज सुमारे 1 हजार मेगावॅटने कमी होऊ शकते. त्याचबरोबर रात्री 9 वाजताची वेळ असल्यामुळे ही गरज अजून 1 हजार मेगावॅटने कमी झालेली असेल. म्हणजेच 5 एप्रिलला रात्री 9 वाजता राज्याची विजेची गरज ही 11 हजार मेगावॅटची असेल असे जाणकारांचे मत आहे.

कोणताही विद्युत निर्मिती संच हा पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करत असल्यास तो सक्षमपणे काम करतो. त्याची एकूण क्षमता जी असेल त्या क्षमतेत अनावश्यक घट झाल्यास संच बंद पडण्याची विरोधक व्यक्त करीत असलेली भीती ही रास्त  आहे. मात्र ती शक्यता केव्हा याचा विचार विरोधकांनी केला तरी नाही किंवा माहित असूनही दुर्लक्ष केले आहे. तज्ज्ञांच्या मते प्रत्येक संचाच्या क्षमतेच्या 1/3 या प्रमाणात विद्युत निर्मिती कमी झाली तर फारसा फरक पडत नाही. म्हणजेच 210 मेगावॅट निर्मितीच्या संचात 140 मेगॉवटपर्यंत विद्युत निर्मिती खाली घसरली तरी काहीही परिणाम होत नाही. जर 140च्या खाली त्यातही निम्म्यावर विद्युत निर्मिती आली तरच हा 210 मेगावॅटचा संच बंद पडेल आणि पुन्हा सुरु करण्यासाठी  16 तासांची झटापट करावी लागेल.

आपल्या घरात आपण वीज वापरतो ती फक्त प्रकाशासाठी नाही तर विविध उपकरणासाठीही वापरली जाते. घरात रात्री 4 दिवे लावतो त्याचवेळी प्रत्येक खोलीतला पंखा सुरु असतो. बहुसंख्य घरांमध्ये फ्रीज चालू असतातच. अनेक  बहुमजली इमारतींमध्ये लिफ्ट सुरु असतातच. घराघरांमध्ये बरेचदा वातानुकूलित यंत्रणाही सुरु असतात. 10 मिनिटांसाठी बालक्नीत येताना खोलीतला एसी बंद करून कोणी येत नाही. त्यामुळे विजेची मागणी झपाटून घसरेल हा दावा  निरर्थक वाटतो.

तज्ज्ञांच्या मते 10 मिनिटे फक्त विजेचे दिवे बंद केले तर महाराष्ट्रात अजून 1 हजार ते 1200 मेगावॅट वीज कमी वापरली जाईल.(एकूण क्षमतेच्या 10 टक्के वीज घरगुती दिव्यांसाठी वापरली जाते.) आधी नमूद केल्याप्रमाणे आपण 11 हजार मेगावॅट वीज रविवारी रात्री 9 वाजता वापरणार आहोत. त्यात हजार मेगावॅट वीज कमी लागली तर 10 हजार मेगावॅट इतकी आपली गरज असेल. आज महाराष्ट्राला 13 हजार मेगावॅट वीज लागत असून तितकीच निर्मितीही होते आहे. यावेळी  8500 मेगावॅटपर्यंत विजेची गरज खाली घसरली तरी विद्युत निर्मितीवर काहीही परिणाम होणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्रात सध्या औष्णिक विद्युत केंद्रांच्या माध्यमातून वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. यात कोयना येथील जल विद्युत केंद्रही आपला वाटा उचलत असते. विशेषतः संध्याकाळच्या वेळी गरज वाढल्यास कोयना येथील जल  विद्युत केंद्राची वीज वापरली जाते. तिथेही 1 हजार मेगावॅटपेक्षा अधिक वीज कायम उपलब्ध असते. गरज पडल्यास ही वीज अतिरिक्तही वापरता येऊ शकते. त्यामुळे जरी गरज वाढली तरी भूक नसली तरी शिदोरी असावी या न्यायाने  राज्याजवळ तरतूद आहेच.

हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 10 मिनिटे महाराष्ट्रातील सर्व जनतेने आपापल्या घरचे दिवे बंद केले तरी कोणतेही आकाश कोसळणार नाही हे स्पष्ट होते. तरीही या देशातील मोदी विरोधक कालपासून आकांडतांडव करीत आहेत. महाराष्ट्राचे सुविद्य ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की, 10 मिनिटे वीज बंद करायची म्हणून एखाद्या उत्साही सिक्युरिटी गार्डने मोठ्या बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डने इमारतीचे मेन स्विचच बंद केले तर काय करता? राऊत यांचा हा दावा मला काहीसा हास्यास्पद वाटतो. मोदींनी आपापल्या घरातील फक्त दिवे बंद करायला सांगितले आहेत. त्यामुळे कोणीही उत्साहाच्या भरात मेन स्विच बंद करायला जाईल असे मला  तरी वाटत नाही आणि असे उत्साही निघालेच तर हजारात एखादा निघेल. त्यातून वीजेची गरज इतकी खाली घसरेल की विद्युत निर्मिती बंद पडेल अशी वेळ येण्याची शक्यता मला तरी वाटत नाही.

इथे आणखी एक मुद्याकडे मला लक्ष वेधायचे आहे. कालपासून या मुद्यावर जी ओरड सुरु झाली ती बघितल्यावर क्षणभर माझ्या मनात शंका आली की नरेंद्र दामोदरदास मोदी नावाचा हा पंतप्रधान असलेला माणूस हा महामूर्ख तर नाही ना? मात्र दुसर्‍याच क्षणी हा विचारही आला की जो माणूस साध्या चहावाल्यापासून तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत वाटचाल करू शकतो आणि जागतिक क्षितीजावरही आपली सकारात्मक प्रतिमा निर्माण करू शकतो तो मूर्ख निश्‍चितच नाही.  दुसरे म्हणजे पंतप्रधानपदी कार्यरत असलेली व्यक्ती ही सर्वज्ञ असतेच असे नाही. मात्र त्यांच्यासोबत तज्ज्ञ सल्लागारांची चमू कार्यरत असते. त्यांच्या सल्लायनेच कामे होत असतात. त्यामुळे पंतप्रधानांना नाही समजले तरी सल्ला देणारे हे  तज्ज्ञ तर मार्गदर्शन करू शकतातच ना. आज मोदींच्या मंत्रिमंडळातही विविध विषयांवरील तज्ज्ञ आहेत. असा धोका ते कधीच पत्करू देणार नाहीत आणि मोदीही असा आत्मघातकी निर्णय घेतील असे कोणत्याही सुजाण माणसाला पटणार  नाही. हे सर्व मुद्दे लक्षात घेता मोदींच्या 10 मिनिटे घरातील विजेचे दिवे बंद करून मेणबत्ती किंवा टॉर्च पेटवून प्रकाश करा या घोषणेला सुरु असलेला विरोध हा फक्त राजकीय आणि निरर्थक आहे हे स्पष्ट होते आहे. मोदींच्या आवाहनाला  प्रतिसाद द्यायचा की नाही हा प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत निर्णय असेल मात्र 10 मिनिटे वीज बंद ठेवल्यामुळे विद्युत निर्मिती संच बंद पडतील आणि देशभरात हाहाःकार उडेल हा दावा निरर्थक, हास्यास्पद आणि विकृत मनोवृत्तीचे दर्शन  घडवणारा आहे हे निश्‍चित. त्यामुळे मोदींना साथ द्यायची किंवा नाही हा निर्णय घेताना महाराष्ट्राच्या सुविद्य ऊर्जामंत्र्यांनी मांडलेला तर्क हा पूर्णतः अतार्किक आहे हे लक्षात घेऊनच जनसामान्यांनी निर्णय घ्यावा इतकीच अपेक्षा यावेळी व्यक्त करावीशी वाटते.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही तर समजून घ्या राजे हो.....
- अविनाश पाठक