सिनेमॅटिक स्‍क्रीन' चा उपयोग शिक्षण व मनोरंजनासाठी - नितीन गडकरी यांचे प्रतिपादन, - मकरंद अनासपुरे यांच्‍या हस्‍ते लोकार्पण

February 15,2021

नागपूर,
सुरेश भट सभागृहात लावण्‍यात आलेल्‍या भव्‍य सिनेकॅटिक स्‍क्रीनचा शिक्षण, मनोरंजन व विज्ञान-तंत्रज्ञानाला लोकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी होईल. विद्यार्थी, महिला, शेतकरी बांधव, युवा वर्गाला या सिनेमॅटिक स्‍क्रीनचा अधिकाधिक लाभ कसा होईल, याकडे मनपाने लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्‍म, लघू व मध्‍यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.


खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने आयोजित केलेल्‍या सिनेमॅटिक स्‍क्रीन लोकार्पण सोहळ्यात नितीन गडकरी बोलत होते. त्‍यांच्‍या ‘स्मार्ट व्हिजन’मधून साकारलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहाच्‍या सौंदर्यात या भव्य सिनेमॅटीक स्क्रीनने अधिक भर घातली असून या स्‍क्रीनचे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपूरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्‍यात आले.

भारतीय राष्‍ट्रीय राजमार्ग प्राधीकरण नागपूर व प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने 32 व्‍या राष्‍ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत घेण्‍यात आलेल्‍या विशेष कार्यक्रमानंतर लोकार्पणाचा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी, सर्व आमदार प्रवीण दटके, कृष्‍णा खोपडे, मोहन मते, समीर मघे, राजू पारवे, टेकचंद सावरकर, खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, मधूप पांडे यांच्‍यासह अनेक मान्‍यवर उपस्थित होते.

नितीन गडकरी म्‍हणाले, सुरेश भट सभागृह हे नागपूरच्‍या जनतेच्‍या मालकीचे असून त्‍यांना त्‍याचा उपयोग व्‍हावा या उद्देशान सिनेमॅटिक स्‍क्रीन येथे लावण्‍यात आली आहे. या स्‍क्रीन शेतक-यांना प्रशिक्षित करणारे लघूपट, विद्यार्थ्‍यांमध्‍ये मूल्‍ये रूजविणारे चरित्रपट, महिला सक्षमीकरणासाठी तसेच, युवकांच्‍या शिक्षण व मनोरंजनसाठी चित्रपट दाखविण्‍याचा मानस आहे. युएफओ कंपनीने दिलेल्‍या देणगीतून ही स्‍क्रीन येथे लावण्‍यात आली असून तिचे मनपाला हस्‍तांतरण करण्‍यात येत आहे. मनपाने या स्‍क्रीनचा नागपूरकरांना लाभ करून द्यावा. कोविडमुळे यंदा खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव झाला नाही. या स्‍क्रीनचा वापर करून सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजित करता येऊ शकतो, हेदेखील मनपाने बघावे, असे नितीन गडकरी म्‍हणाले.

......
असे नाट्यचित्रपटगृह इतरत्रही हवे
सुरेश भट सभागृहात सिनेमॅटिक स्‍क्रीन लावल्‍यामुळे सभागृहाचे नाट्यचित्रपटगृहात रूपांतर झाले आहे, ही बाब कलावंतांसाठी अतिशय आनंदाची आहे. राज्‍यातील इतरही नाट्यगृहांमध्‍येही असा स्‍क्रीन लावला तर मराठी चित्रपटांचे प्रदर्शनदेखील तेथे करता येईल आणि चित्रपट कलावंतांना चांगले दिवस येतील. मराठी चित्रपटसृष्‍टीला अशा नाट्यचित्रपटगृहांनी अतिशय गरज हे, स्ष्‍टीला , असे मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्‍यक्‍त केले.
........
असा आहे सिनेमॅटिक स्‍क्रीन
सुरेश भट सभागृहातील मंचावर १४.५ बाय ३४ आकाराचा ही भव्‍य सिनेमॅटिक स्‍क्रीन लावण्‍यात आली आहे. त्‍यावर चित्रपट आदी व्हिडिओ दाखविण्‍यासाठी ९ हजार ल्युमेन्सचा प्रोजेक्टरची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. चित्रपट दाखवायच्‍या वेळी ही स्‍क्रीन खाली आणण्‍याची व्‍यवस्‍था आहे. या स्‍क्रीनवरून शैक्षणिक, चरित्रात्‍मक, विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित चित्रपट दाखवण्‍यात येणार आहेत.
......