मध्यरात्री मृत्यू तर पहाटेच अन्त्यसंस्कार

April 03,2020

नागपूर, 3 एप्रिल -  मध्यरात्री बहिणीचा मृत्यू झाला. सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 22 मार्चपासून देशभर संचारबंदी लागू केली आहे. त्यातच मध्यरात्री वृद्धपकाळाने सुशिलाबाई ठाकूर यांचे निधन झाले. मग काय गावातील  सूज्ञ नागरिक, उपसरपंच चौधरी व सुशिलाबाई ठाकूर यांचे भाऊ बंडू चौधरी यांनी निर्णय घेतला. तातडीने अंत्यविधीची तयारी सुरु केली. मध्यरात्री मृत्यू व पहाटेच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील काही नागरिकांनी मदतीचा  हात दिला. गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथे हा प्रकार घडला.

तालुक्यातील सुपगाव येथील बंडू चौधरी यांनी बहीण सुशिलाबाई ठाकूर वृद्धापकाळाने त्या मागील काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांंना मूलंबाळ व कुणाचा आधार नसल्याने त्या एकट्या आपल्या भावाकडे सुपगाव येथे राहत होत्या. देशात जन राज्यात कोरोनामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. 14 तारखेपर्यंत जमावबंदीसुद्धा लागू करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात  घेता आता करायचे काय, असा प्रश्‍न कुटुंबियांना पडला. यावेळी गावातील उपसरपंच चौधरी व गावातील नागरिकांनी विचार करून पहाटेच सुशिलाबाई यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला. गावातील लोकांनीसुद्धा  मृतक सुशिलाबाई यांचे भाऊ बंडू नानाजी चौधरी यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला व पहाटेच अंतिम संस्काराचे सोपस्कार पार पडले.