डॉ. आनंद संचेतींनी बनवला नवा व्हेंटिलेटर - एकाचवेळी 8 रुग्णांना देणार श्‍वसन सुविधा

April 03,2020

नागपूर, 3 एप्रिल -  कोरोना विषाणू रुग्णाच्या फुफ्फुसांना सर्वाधिक बाधा पोहचवितो. यामुळे रुग्ण गंभीर झाल्यास रुग्णाला श्‍वास घेणे अडचणीचे जाते. अशावेळी फुफ्फुसात ऑक्सिजन पोहचवण्यासाठी व्हेंटिलेटरची गरज पडते. परंतु  नागपुरात सुमारे 350वर व्हेंटिलेटर नाहीत. अचानक गंभीर रुग्ण वाढल्यास व्हेंटिलेटरअभावी कुणावरील उपचार थांबू नये, यासाठी हृदयशल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांनी एका व्हेंटिलेटरमधून आठ जणांना ऑक्सिजन देता येईल, असे  उपकरण तयार केले आहे. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशासह राज्यातही कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे यात गंभीर रुग्णांची संख्या फार कमी आहे. परंतु खबरदारी म्हणून शासन मोठ्या संख्येत  क्रिटिकल केअर खाटांची सोय करीत आहे. यात महत्त्वाचे ठरते ते व्हेटिलेटर. 100 खाटांच्या तुलनेत 60 टक्के व्हेंटिलेटरची गरज पडते. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली विमान व रेल्वे वाहतूक, एवढ्या मोठ्या संख्येत व्हेंटिलेटरची  खरेदी करणे किंवा ते विदेशातून मागविणे अडचणीचे ठरू शकते. यावर उपाय म्हणून न्यू ईरा हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती यांनी एका व्हेंटिलेटरची मदत एकापेक्षा जास्त रुग्णांना होऊ शकते का, यावर विचार करणे सुरु केले  त्यांनी संगणकाच्या मदतीने थ्रीडी उपकरण तयार केले. यासाठी अमेरिकेच्या थ्रीडी डिझाईनची मदत घेतली.

नागपुरातील समीर भुसारी यांनी त्या डिझाईननुसार उपकरण तयार करुन दिले. सोमवारी त्यांनी या उपकरणाच्या मदतीने आठ रुग्णांना व्हेंटिलेटरमधून ऑक्सिजन पुरविण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाली. या उपकरणाला त्यांनी व्हेंटिलेटर स्प्लीटर हे नाव दिले आहे.