धर्मगुरुंच्या मदतीने पोलिस करताहेत जनजागृती

April 03,2020

नागपूर, 3 एप्रिल - कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आल्यापासून देशातील काही भागात पोलिस आणि नागरिकांमध्ये वाद होत चित्र झळकत आहेत. परंतु, नागपुरातील ताजबाग परिसरात उलट परिस्थिती जाणवत आहे. सक्करदरा पोलिसांनी मुस्लिम धर्मगुरु, मौलाना आणि सामजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त चमूला सोबत घेऊन येथील मुस्लिम नागरिकांना संचारबंदीचे महत्त्व समजावून सांगण्यास सुरुवात केली आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

ही चमू दर दिवशी सकाळ-सायंकाळी अवघा ताजबाग परिसर आणि मशिदी पालथ्या घालून स्थानिक नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करतात. मुख्य म्हणजे स्वतः मौलाना साहेब पोलिसांच्या गाडीत बसून मुस्लिमांना संचारबंदीचे महत्त्व समजावून सांगत असल्याने नागरिकसुद्धा त्यांच्या शब्दांचा मान राखत आहे. परिणामी, या. परिसरात संचारबंदी लागू झाल्यापासून कुठेही पोलिस आणि नागरिकात हुज्जतबाजी झाल्याचे अद्यापतरी कानावर आलेले नाही. संवेदनशील भागात संचारबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी धर्मगुरुची मदत घेणारे सक्करदरा पोलिस प्रशासन हे नागपुरातील पहिले पोलिस प्रशासन ठरत आहे. ही बाब उल्लेखनिय आहे.

सक्करदरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित सिद यांनी शहर पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि झोन क्रमांक 4 च्या डीसीपी निर्मलादेवी यांच्या आदेशानुसार सक्करदरा पोलिस ठाण्यात कार्यरत गुप्तचर विभागाचे अधिकारी सुनील सरदार यांच्या खांद्यावर मुस्लिमबहुल भागात संचारबंदीच्या आदेशाचील अंमलबजावणी करण्याची जबपाबदारी सोपविली आहे. त्यांच्या मदतीला पोलिस कर्मचारी पंकज कुंभलकर, ममता बन्सोड यांचीसुद्धा मदत होत  आहे.