नागपुरात 225 बंदी सुटणार पॅरोलवर

April 03,2020

नागपूर, 3 एप्रिल -  कोरोनावर प्रतिबंध म्हणून सर्वोच्च न्यायालयाने 7 वर्षे व त्यापेक्षा कमी कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या बंदिवानांना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, विविध कलमानुसार गुन्ह्यांचे खटले सुरु  असलेल्या नागपूर जिल्ह्यातील 225 बंदिवानांना 45 दिवसाकरिता तात्पुरत्या जामीनावर सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अभिजित देशमुख यांनी दिली.

सर्व बंदिवान नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. देशातील बहुतेक कारगृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बंदिवान आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग व अन्य आवश्यक उपाययोजना करणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत कारागृहात कोरोना शिरण्याची भीती आहे. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने 7 वर्षे शिक्षा त्यापेक्षा कमी कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांचे खटले सुरु असलेल्या बंदिवानांना वैेयक्तिक बंधपत्र घेऊन तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे निर्देश  दिले.