शेगावतही रामजन्म उत्सवाची परंपरा खंडित

April 03,2020

नागपूर, 3 एप्रिल :  श्रीराम जय राम आणि गण गण गणात बोते च्या गजरात टाळ, मृदंगधारी, वारकरी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत संतनगरी शेगावात दरवर्षी रामनवमी उत्सव साजरा होतो. श्रीं ची पालखी मिरवणूक आणि विविध  धार्मिक कार्यक्रम पार पडतात. मात्र यावेळी कोरोना च्या संकटामुळे श्रींच्या पालखीची 125 वर्षांची परंपरा खंडित झाली. भाविकांच्या गर्दीविनाच अत्यंत साध्या पद्धतीने मंदिरात 2 एप्रिल रोजी रामनवमीची पूजा पार पडली. प्रभू श्रीराम हे संत  गजानन महाराजांचे आराध्य दैवत आहे. गजनन महाराज संस्थानच्या वतीने रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यानिमित्तिाने गुढीपाडव्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आणि रामनवमीला  शहरातून श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने राज्यभरातील मंदिरे बंद करण्याचे आदेश दिल्याने यावर्षी सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

शिवाय श्रींचे मंदिरही भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शेंगावत 125 वर्षानंतर पहिल्यांदाच रामनवमीला भाविकांची गर्दी दिसली नाही. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक  रामनवमीला शेगावात येतात. महाराजांच्या कार्यकाळातच संस्थानमध्ये रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली होती. विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून शेगावची रामनवमी यात्रा प्रसिद्ध आहे. गेल्या 125 वर्षांपासून रामनवमीचा सोहळा  भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.