राक्षसी संकटापासून मुक्त होण्याचा संकल्प करू या भय्याजी जोशी

April 03,2020

आज आपण एका वेगळ्या, पण भीषण संकटातून जात आहोत. संपूर्ण जग भयभीत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणे हे आपले उद्दिष्ट आहे. त्यासाठी सरकार आणि आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल या सर्वई सूचनांचे काटेकोर पालन केले. तरच  आपण या संकटातून मुक्त होऊ शकतो. रामनवमीच्या पर्वावर आपण सर्वांनीच हा संकल्प करून जगापुढे आगळा आदर्श प्रस्थापित करायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.

रामनवमीनिमित्त व्हिडिओ लिंकद्वारे स्वयंसेवकांशी संवाद साधताना भय्याजी म्हणाले की, प्रभूरामचंद्रांनी सर्व राक्षसी शक्तींचा निपात केला. आज आपणही एका भयानक संकटातून जात आहोत त्यामुळे संपूर्ण जग भयभीत आहे. अशावेळी आपणही प्रभू रामचंद्राचा आदर्श ठेवून संपूर्ण जग कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करू या असा हितोपदेश त्यांनी यावेळी केला.

या संकटाच्या काळात देशाच्या प्रत्येक भागात राष्ट्रीय स्वयंसेवक साघेचे स्वयंसेवक सेवाकार्य करीत आहेत. जसजशी आवश्यकता निर्माण होत आहे. त्याच्या पूर्ततेसाठी आज देशभरात हजारो स्वयंसेवक सेवाभावाच्या माध्यमातून या  संकटात समाजाच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे. आज सुमारे दहा हहजार ठिकाणी एक लाखावर स्वयंसेवक विभिन्न गरजांच्या पूर्तता करीत आहेत. या अंतर्गत सुमारे दहा लाख परिवारांपर्यंत संघाचे स्वयंसेवक वेगवेगळ्या  माध्यमातून पोहचत आहेत. याशिवाय एक लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक वेगवेगळ्या सेवाकार्य आणि सामाजिक जागृतीच्या कार्यात सक्रिय आहेत. विशेषतः अन्नधान्य आणि सॅनिटायझरसारख्या उपयुक्त वस्तूंचा पुरवठा करणे. रुग्णालयामध्ये  जाऊन सेवा देणे, यासारख्या कामांमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे, अशी माहितीही भय्याजींनी यावेळी दिली.

महाराष्ट्रात भटक्या विमुक्त्यांच्या वस्त्यांमधून जाऊन त्यांच्यासाठी भोजन आणि इतर आवश्यक सेवाही स्वयंसेवकांनी उपलब्ध केल्या आहेत. आतापर्यंत एक हजारावर स्वयंसेवकांनी रक्तदानही केलेले आहेत. सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचारी, डॉक्टर आणि परिचारिका, सफाई कामगार हे देखील दिवसरात्र काम करीत आहेत. त्यांना आवश्यक त्या सेवा उदाहरणार्थ चहा, भोजन, अल्पाहार इत्यादी पोहोचवण्याचे कामही स्वयंसेवक करीत असून, समाजाने घेण्याच्या  काळजीबाबतही जनजागृती करीत असल्याचे भय्याजींनी सांगितले.

कामगारांच्या स्थलांतराकडे लक्ष वेधत त्यांच्यातील भीतीची भावना कमी कशी करता येईल यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे भय्याजी जोशी यांनी सांगितले. आहे त्या स्थितीत पूर्ण समाज आपल्या पाठीशी आहे आणि आपण तिथेच रहा ही भावना त्यांच्या मनात निर्माण करा असे ते म्हणाले.