शेतकरी आंदोलनात फूट

January 27,2021

नवी दिल्ली : २७ जानेवारी - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट पडली. या आंदोलनातून भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं आपलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली.

भारतीय किसान युनियनचे नेते ठाकूर भानूप्रताप सिंह चिल्ला बॉर्डर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, “दिल्लीत काल जे काही घडलं यानं मला खूपच दुःख झालं. त्यामुळे आम्ही ५८व्या दिवशी आमचं आंदोलन थांबवत आहोत.” भाकियूच्या या गटाला संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वीच आंदोलनापासून वेगळं केलं होतं. कारण सुरुवातीला सरकारच्या मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आंदोलन संपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सर्व शेतकऱ्यांच्या भावना पाहता त्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं होतं.

तर राष्ट्रीय किसान मजदूर संघटनचे व्ही. एम. सिंग म्हणाले, “ज्यांचा हिंसाचाराचा मार्ग आहे त्यांच्यासोबत आम्ही आमचं आंदोलन पुढे नेऊ शकत नाही. आंदोलन चालू ठेवण्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत पण व्ही. एम. सिंग आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघटन या आंदोलनातून आणि ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीतून माघार घेत आहे.”

राकेश टिकैत आणि इतर शेतकरी नेत्यांवर आरोप करताना सिंग म्हणाले, “ज्यांनी लोकांना भडकावलं त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. भारताचा झेंडा, देशाची स्वाभिमान, मर्यादा सर्वांसाठी आहे. ही मर्यादा ओलांडणारे आणि त्यांना ती ओलांडू देणारे सर्व चुकीचे आहेत. टिकैत यांच्यावर आरोप करता ते वेगळ्या मार्गाने जाऊ पाहत होते असं सिंग यांनी म्हटलं आहे.