बिहारमध्ये भाजपच्या प्रवक्त्यावर गोळीबार

January 27,2021

पाटणा : २७ जानेवारी - बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारत नसल्याचं वारंवार घडणाऱ्या घटनांमधून समोर येत आहे. राज्यातील जमालपूरमध्ये भाजप प्रवक्ते अजफर शम्शी यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाला आहे. अजफर शम्शी गोळीबारात गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पुढील उपचारासाठी अजफर शम्शी यांना पाटणामध्ये हलवण्याची तयारी सुरु आहे.

भाजप प्रवक्ते अजफर शम्शी प्राध्यापक आहेत. जमालपूर कॉलेजमध्ये लेक्चर घेण्यासाठी शम्शी गेले होते.कॉलेजच्या गेटवरच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार हल्लेखोर अजफर शम्शी येण्याची वाट पाहत दबा धरुन बसले होते. बुधवारी (27 जानेवारी) सकाळी 11 वाजता अजफर जमालपूर कॉलेजमध्ये पोहोचले असता हल्लेखोरांनी गोळीबार केला. अजफर शम्शी गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. 

भाजप प्रवक्ते अजफर शम्शी यांच्या ड्रायवरच्या समोर हा सर्व प्रसंग घडला. गोळीबारावेळी तो तिथेच उपस्थित होता. कॉलेजमधील कार्यक्रम संपवून बाहेर पडत होतो. त्यावेळी कॉलेजच्या गेटवर मोठी गर्दी होती. या दरम्यान एका प्राध्यापकांनी शम्शीसर खाली पडले, असं ओरडण्यास सुरुवात केली. यानंतर लोक जमा झाले आणि शम्शी यांना रुग्णालयात घेऊन गेले.

अजफर शम्शी यांच्यावरील गोळीबाराची माहिती मिळताच भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ.संजय जैयस्वाल यांनी डिजीपी एस.के.सिंघल यांच्यांशी संवाद साधला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली.

दरम्यान, बिहारमधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारवर हल्ला चढवत आहेत.