शेतकरी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न - सुधीर मुनगंटीवार

January 27,2021

चंद्रपूर : २७ जानेवारी - “प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान गोळीबार व्हावा, असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. गोळी चालली असती तर पुन्हा हेच लोकं अन्नदाता शेतकऱ्यावर गोळी चालवली, असं बोलले असते. मात्र, केंद्र सरकारने जे संयम दाखवले त्याला सलाम आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मावळमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या आणि किड्यामाकोड्या सारखे शेतकरी मेले”, असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला 

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मार्च 2019 मध्ये पवना जलवाहिनी विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अजित पवार यांनीच पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर गोळी चालवण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र, अजित पवारांनी आरोप फेटाळला होता. याशिवाय “मावळच्या आंदोलक शेतकऱ्यांवर मी गोळीबाराचे आदेश दिल्याचे सिद्ध झाल्यास मी राजकारणातून सन्यास घेईन”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती.

 “दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आलेलं हिंसक वळण हे केंद्र सरकारचं अपयश नाही. ज्या पक्षांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला 26 जानेवारी रोजी दिल्लीत प्रवेशासाठी परवानगी देण्याबाबतची भूमिका घेतली त्यांचं हे अपयश आहे. सरकारने या आंदोलनात अतिशय संयमाने भूमिका घेतली. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करेल”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“दिल्लीत ते पुतना मावशीच्या रुपात आलेले काही षडयंत्रकारी लोकं होते. या लोकांनी षडयंत्र केले. 26 जानेवारीचा दिवस निवडला. दिल्ली पोलीस, दिल्ली पोलीस आयुक्तांनी वारंवार हे आंदोलन 26 जानेवारीला करु नका, असं आवाहन केलं. मात्र, तरीही आंदोलकांनी ऐकले नाही. याउलट परवानगी दिली नाही तर याद राखा, असा गंभीर इशारा दिला गेला”, असं मुनगंटीवार म्हणाले.