केंद्राने शहाणपणा दाखवत टोकाची भूमिका सोडावी - शरद पवार

January 27,2021

मुंबई : २७ जानेवारी - 'दिल्लीतील घटनेचं समर्थन करता येणार नाही, पण ते का घडलं हे ही लक्षात घ्यायला हवं. अजूनही केंद्राने शहाणपण दाखवावा. टोकाची भूमिका सोडावी आणि अनुकूल निर्णय घ्यावा. गेल्या अनेक वर्षांपासून शांत असेलला पंजाब पुन्हा अस्वस्थ करू नका, याचं पातक मोदी सरकारने करू नये,' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या संपूर्ण प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'मुंबईतही आंदोलन झाले, ते संयमाने हाताळलं गेले. तशीच भूमिका केंद्राने घ्यायला हवी होती. बळाचा वापर करणे चुकीचे. हा शेतकऱ्यांचा उद्रेक आहे, ते विघातक करणारे नाही. विघातक कृत्य करणारे एवढ्या मोठ्या संख्येने येतात का?' असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. तसंच या देशावर जेव्हा जेव्हा संकट आलं आहे तेव्हा तेव्हा पंजाब समोर आला आहे.देशाचं संरक्षण करणाऱ्या पंजाबी लोकांना खलिस्तानी बोलणं चूक आहे, असंही शरद पवार म्हणाले.