खासदार आणि आमदारांच्या वादामुळे मालेगाव शहर कडकडीत बंद

January 27,2021

वाशिम : २७ जानेवारी - शिवसेनेच्या खासदार भावना गवळी व भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मध्ये प्रजासत्ताकदिनी शाब्दिक वाद झाला होता. त्या वादाचे पडसाद वाशिम जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली आहे. यामध्ये आमदार राजेंद्र पाटणी यांच्या समर्थकांनी मालेगाव शहर बंदचे आवाहन केले आहे. त्यानंतर आज सकाळपासूनच मालेगाव शहर कडकडीत बंद करण्यात आला आहे.

मालेगाव शहरामध्ये एकीकडे आमदार राजेंद्र पाटणी यांचे समर्थक दुकानं बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेच्यावतीने पुन्हा शहरातील दुकाने खोलण्यासाठी मोटर सायकल रॅली काढण्यात आली आहे. या दोन्ही पक्षाच्या वादामुळे मालेगावात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी मालेगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.

प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची सभा होती. तत्पूर्वी खासदार गवळी यांनी भाजप आमदार राजेंद्र पाटणी या दोघात वाद झाला. या वादामुळे परिसरात एकच खळबळ झाली असून दोघांमध्ये पोलीस कर्मचारी व इतर कार्यकर्त्यांमुळे हा वाद निवळला. मात्र या वादाची जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात चर्चा होत आहे.

याप्रकरणी खासदार भावना गवळी याच्या विरोधात आमदार राजेंद्र पाटणी यांनी अश्लील शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. तसेच आमदार पाटणी यांनी देखील खासदार गवळी यांच्या विरोधात वाशिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.