पोलीस विभागाच्या फास्ट रिस्पॉन्स सिस्टिमचे सुनील केदारांनी केले लोकार्पण

January 27,2021

वर्धा : २७ जानेवारी - पोलीस विभागातील नियंत्रण कक्षात स्थापित असलेला ‘डायल 100’ क्रमांकाच्या यंत्रणेचे अद्ययावतीकरण करून ‘फास्ट रिस्पॉन्स सिस्टीमचे’ आज राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ‘फास्ट रिस्पॉन्स सिस्टीम’मुळे नागरिकांना कायदा व सुव्यस्थेबाबत आवश्यक पोलीस मदत तात्काळ उपलब्ध होईल तसेच अडचणीत सापडलेल्या लोकांना लवकर दिलासा मिळेल, असा विश्वास सुनील केदार यांनी लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी व्यक्त केला.

जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात ‘सेफ सिटी प्रकल्पातंर्गत’ स्थापित ‘फास्ट रिस्पॉन्स सिस्टीम’चे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी सुनील केदार म्हणाले, “पूर्वी 100 क्रमांकावर संदेश आल्यावर त्यात क्रॉस कनेक्शन, फोन वेटींग, आवाजात खरखर इत्यादी अडचणी येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. विशेष करुन महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक आणि संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत मिळण्यास उशीर होण्याची शक्यता मोठी होती. ही अडचण लक्षात घेऊन 100 क्रमांकाची यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता 100 क्रमांकावर संदेश आल्यावर संबधित पोलीस मोबाईल वाहन व पोलीस ठाणे यांना जलदगतीने संदेश देऊन तात्काळ नागरिकांना पोलीस मदत उपलब्ध होईल.”

पोलीस अधीक्षक व यंत्रणेचे काम सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात अद्ययावत यंत्रणेची माहिती दिली. नागरिकांनी पोलिस विभागाला दिलेली माहिती साठवून ठेवण्याची सुविधा पूर्वी 100 क्रमांकावर नव्हती. आता ही सुविधा सुद्धा यामध्ये उपलब्ध झाल्यामुळे साठविलेल्या माहितीचे पोलीस विभागाला अवलोकन करुन त्याबाबत आवश्यक सुधारणा व उपाययोजना करणे शक्य होणार आहे. यासाठी पोलीस विभागाच्या वाहनावर जीपीएस प्रणालीचा उपयोग करण्यात आला असून वाहनाच्या हालचालीवर लक्ष ठेऊन त्यांना आवश्यक ती मदत पुरविणे शक्य होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक होळकर यांनी दिली.