गणतंत्र हे संघतंत्र होऊ नये यासाठी लढण्याचा संकल्प करा - सचिन सावंत

January 27,2021

मुंबई : २७ जानेवारी - प्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चालली असून गणतंत्र हे संघतंत्र होऊ नये याकरिता लढणे हाच संकल्प ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने योग्य आहे. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो हे म्हणताना तो चिरायू राहावा ही जबाबदारी आपली आहे हे लक्षात ठेवा! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मोदी सरकारवर निशाणा साधल्याचेही दिसून आले.

याशिवाय “राज्य सरकारने ९९ नावांची शिफारस पद्म पुरस्कारांसाठी केली त्यामध्ये केवळ पद्मभूषणसाठी सिंधुताई सपकाळ यांचे दिलेले नाव मोदी सरकारने लक्षात घेतले. त्यातही सिंधुताईंना पद्मश्री देण्यात आला. यामध्ये भाजपाशी व संघाशी जवळीक हाही निकष होता. युपीएलचे अध्यक्ष त्याच प्रकारे आले असे दिसते.” असही सावंत यांनी म्हटले आहे.

तसेच, “राज्य सरकारच्या शिफारशींना कुठल्याही प्रकारची किंमत न देणं, हे अत्यंत दुर्देवी आहे. अशा प्रकारच्या घटना अत्यंत दुर्मिळ म्हणाव्या लागतील. हे पुरस्कार दिले गेले तेव्हा निश्चितपणे एक गोष्ट समोर आली आहे. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा देखील निकष यामध्ये ठरवण्यात आलेला आहे, जे अत्यंत दुर्देवी आहे. पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून जी नाव निवडण्यात आली त्यांना, आम्ही शुभेच्छा देतो. फक्त एक जे नाव आहे, ते म्हणजे रजनीकांत श्रॉफ जे युनायटेड फॉस्फरस लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. या कंपनीचा भाजपाशी अतिशय जवळचा संबंध आहे. या कंपनीच्या संचालक मंडळावर केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांचे सख्खे भाऊ आहेत व मागील अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी कार्यरत आहेत. याच कंपनीच्या आवारात निवडणूक आयोगाने धाड टाकली होती. तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांसह मी स्वतः तिथं उपस्थित होतो. तिथं सहा कोटी रुपयांचे अनधिकृत प्रचार साहित्य सापडलं होतं. त्यानंतर हे साहित्य निवडणूक आयोगाकडून सील करण्यात आलं होतं. हे साहित्य नरेंद्र मोदी यांचं होतं.” अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली आहे.