नामांतर मोहिमेला प्रज्ञा ठाकूर यांचाही पाठिंबा

January 27,2021

भोपाळ : २७ जानेवारी - भाजपाच्या खासदार उमा भारती यांच्यानंतर आता भोपाळच्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी जागांचे नामांतर करण्याच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये सध्या भाजपाचे अनेक नेते राज्यातील लोकप्रिय ठिकाणांचे नामांतरण करण्याला पाठिंबा देताना दिसत आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी भोपाळ शहरातील काही ठिकाणं आणि लोकप्रिय पर्यटनस्थळांच्या नावांचे नामकरण करण्याची मागणी केली आहे. मुस्लीम प्रशासकांच्या काळातील घटनांवरुन वेगवेगळ्या ठिकाणांना देण्यात आलेली नावं ही अपवित्र असून ती बदलण्याची गरज असल्याचे प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे.

खासदार उमा भारती यांनी केलेल्या नामांतरणाच्या मागणीला प्रज्ञा यांनी पाठिंबा दर्शवला आहे. इतकचं नाही तर प्रज्ञा यांनी हलालपुरा बस स्टॅण्ड, लालघाडी आणि इस्लाम नगर ही नावं बदलण्यात यावीत अशी मागणीही केली आहे. ही नावं म्हणजे अत्याचार करणाऱ्या मुस्लीम शासकांच्या दहशतीची निशाणी आहेत. ही नावं बदलण्यात यावीत. सध्याच्या नावांऐवजी या ठिकाणांना क्रांतीकारकांची नावं देण्यात यावीत अशी मागणी प्रज्ञा यांनी केलीय.

प्रज्ञा यांनी उमा भारतींच्या मागणीचं समर्थन करताना कोणत्याही जागेला एखाद्या व्यक्तीचे नाव दिल्यास त्याचा प्रभाव त्या जागेवर आणि लोकांवर पडतो असं म्हटलं आहे. लालघाटी येथे राणीच्या मुलांची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर हा घाट लाल झाला होता त्यामुळेच त्याचं नाव असं ठेवण्यात आलं होतं. रक्ताने माखलेला घाट अशा अर्थाने या जागेचं नामकरण करण्यात आलं आहे. याचप्रमाणे हलाली डॅम परिसरामध्ये येथील राजांना मोहम्मद खान याने हलाल करुन ठार केलं होतं. त्यामुळेच या जागेला हलाली नाव पडलं. ही नावं आणि त्यांच्या मागील इतिहास खूपच अपवित्र आहे. अशी नाव घेतल्याने अपवित्रता पसरते आणि नकारात्कम प्रचार होतो. अशी मुस्लीम प्रशासकांच्या काळात रक्तरंजित इतिहास असणाऱ्या सर्व ठिकाणांची नावं आम्ही भोपाळमधून पुसून टाकणार आहोत, असं प्रज्ञा यांनी भोपाळमधील एका कार्यक्रमात दिलेल्या भाषणात म्हटलं आहे.