सर्वोच्च बलिदान देणाऱ्या संतोषबाबूंना महावीर चक्र जाहीर, परमवीर चक्र मिळावे कुटुंबीयांची इच्छा

January 27,2021

पाटणा : २७ जानेवारी -लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत सर्वोच्च बलिदान दिलेले कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्रने सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र, या पुरस्कारावर त्यांचे कुटुंबीय समाधानी नाहीत. महावीर चक्र ऐवजी त्यांना सर्वोच्च परमवीर चक्र हा पुरस्कार मिळायला हवा होता असं त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. महावीर चक्र हा देशातील दुसरा सर्वात मोठा शौर्य पुरस्कार आहे.

कर्नल संतोष बाबू यांचे वडील बिकुमल्ला उपेंद्र म्हणाले, “मुलाला महावीर चक्र मिळाल्याने आम्ही पूर्णपणे निराश आहोत. मला आशा होती की माझ्या मुलाच्या बलिदानासाठी सर्वोच्च परमवीर चक्रने सन्मानित केले जाईल.” बिकुमल्ला उपेंद्र हे भारतीय स्टेट बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. तेलंगाणाच्या सूर्यापेट शहरात ते राहत आहेत.

माझ्या मुलाचं बलिदान हे साधारण नव्हतं. खूपच विचित्र परिस्थितीत ते १६व्या बिहार बटालियनचं नेतृत्व करत होते. गलवान खोऱ्यात वातावरण जवानांचा सर्वात मोठा शत्रू होता. त्या बिकट परिस्थितीतही माझा मुलगा १३ महिने गलवान खोऱ्यात तैनात होता. त्यानंतर त्याने शत्रूचा सडेतोड मुकाबलाही केला, असं संतोष बाबू यांच्या वडिलांनी म्हटलं आहे.

बिकुमल्ला उपेंद्र म्हणाले, “कुठल्याही शस्त्रांविना संतोष बाबू यांनी चीनी सैनिकांशी दोन हात केले आणि त्यांचं मोठं नुकसानही केलं. त्यांच्या शौर्यामुळे चीनी सैनिकांना मागे जाणं भाग पडलं. तरीही माझ्या मुलाला परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आलं नाही. केंद्र सरकारने त्यांच्यासाठी महावीर चक्रने सन्मानित करण्याचा पर्याय निवडला.”

१५ आणि १६ जून २०२० च्या रात्री पूर्वी लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारतीय हद्दीत चीनी सैनिकांनी घुसखोरी केली होती. या दरम्यान, दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. या झटापटीत चीनचे ४० सैनिक मारले गेले होते, मात्र चीनने याची पुष्टी केली नाही. या झटापटीत १६व्या बिहार रेजिमेंटमध्ये कमांडिंग ऑफिसर असलेले कर्नल संतोष बाबू हे देखील शहीद झाले होते.