संघ मुख्यालयात झाले ध्वजारोहण

January 27,2021

नागपूर : २७ जानेवारी - आत्मनिर्भर होत आत्मविश्वासाने स्वतःसह देशालाही अग्रेसर ठेवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहन रा.स्व. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य कार्यालय, महालमधील डॉ. हेडगेवार भवन परिसरात मंगळवारी गणराज्य दिनी राजेश लोया यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा ध्वजाला सलामी दिल्यानंतर त्यांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. सुरक्षा जवानांचे निरीक्षण केले. रा.स्व. संघाचे प्रचारक, इतर पदाधिकारी, नागरिक व स्वयंसेवक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राजेश लोया म्हणाले की, संविधानाचा स्वीकार करून अनेक वर्षे झाली. देश योग्य दिशेने चालत आहे. तरीही आपल्याला आज पुन्हा संकल्प करण्याची गरज आहे. देशात थोडाबहुत शिल्लक राहिलेला भेदभाव शक्य तेवढ्या लवकर दूर करू शकतो. अज्ञानता असेल कुठल्या गोष्टीची, तिला दूर करण्याचा प्रयत्न नागरिकांनी करायला हवा. देशाच्या संविधानाचे रक्षण करीत, देशात शांतीसह सौहार्दपूर्ण वातावरणासह आपण आत्मनिर्भर होत, संपूर्ण आत्मविश्वासासह, कुठही हीन भावना न ठेवत, स्वतःला आणि देशालाही अग्रेसर ठेवण्याचा दृढसंकल्प करायला हवा. आपल्या देशातून विश्वशांतीचा संदेश जगभरात जावा. ही काळाची गरज असून असा संकल्प प्रत्येकाने करावा, असे लोया म्हणाले.