कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ५ जण गंभीर जखमी

January 27,2021

अमरावती : २७ जानेवारी - अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरखेड फाट्यानजीक भरधाव कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. ही घटना  दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील कारमधील जखमी नागपूर येथे एसआरपीएफ जवान असून तो कुटुंबासह कर्तव्यावर जात होता. 

या अपघातात कार मधील अरुण रामदास सावळे वय 30 वर्ष, रेखा अरुण सावळे वय 28, स्नेहल अरुण सावळे वय दीड वर्ष रा. सर्व औरंगाबाद तर दुचाकी चालक गोकूल गुलाब डाहे वय 25 वर्ष रा. अंतोरा जिल्हा वर्धा व बाळू बापूराव बारबुद्धे वय 40 रा. वाढोना हे पाच जण गंभीर जखमी झाले. 

औरंगाबाद येथून नागपूर येथे सीआरपीएफ जवान अरुण रामदास सावळे आपल्या कर्तव्यावर नागपूर येथे आपल्या चारचाकी वाहनाने कुटुंबासह जात होते. याच दरम्यान अंतोरा येथून दुचाकी येत होती. वरखेड फाट्याजवळ कारची दुचाकीला धडक बसली. अपघात इतका भीषण होता की कारने तब्बल चार ते पाच पलट्या घेतल्या. यामुळे या कारमधील तीन जण व दुचाकी मधील दोघे असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातात मात्र कारचा अक्षरशः चुराडा झाला होता तर दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके या पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी जखमींना तातडीने तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर कारमधील जखमींना नागपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.