आता विदर्भाकडे दुर्लक्ष होणार नाही मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी व्‍यक्‍त केला आशावाद

January 27,2021

'बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील इंडियन सफारी'चे थाटात उद्घाटन


नागपूर, 26 जानेवारी  - आतापर्यंत विदर्भाकडे दुर्लक्ष झाले होते. पण महाआघाडी सरकारने या एक वर्षाच्‍या कालावधीत समृद्धी महामार्ग, गोरेवाडा उद्यानासारख्‍या योजनांना पूर्णत्‍वाकडे मजबुतीने विदर्भाच्या विकासाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आम्‍ही वाघासारखे काम करीत आहोत आणि एकसंघ राहूनच महाराष्‍ट्राला प्रगती व विकासाच्‍या मार्गाने नेऊ, असा आशावाद मा. ना. श्री. उध्‍दव ठाकरे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी व्‍यक्‍त केला.  महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादित नागपूर द्वारे निर्मित 'बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील इंडियन सफारी'चा उद्घाटन सोहळा मंगळवारी काटोल रोड स्थित गोरेवाडा उद्यानात पार पडला. मा. ना. श्री. उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते या 'बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील इंडियन सफारीचे'  विधीवत उद्घाटन करण्‍यात आले. सोबतच, मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते शुभंकर जंबु अस्‍वल व कोनशीलेचे अनावरण करण्‍यात आले. मुख्यमंत्री यांनी यावेळी इंडियन सफारीचा आनंद घेतला. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्‍ट्रीय प्राणी उद्यानाची माहिती सांगणारी ध्‍वनीफित यावेळी प्रदर्शित करण्‍यात आली.

या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी संजय राठोड, मंत्री, वने व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य होते तर मा. ना. श्री.  अनिल देशमुख, गृह मंत्री, मा. ना. डॉ. नितीन राऊत, ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य व पालक मंत्री,  मा. ना. श्री.  सुनील केदार, पशुसंवर्धन मंत्री, महाराष्ट्र राज्य,  मा. ना. श्री.  आदित्य ठाकरे, पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य, खा. कृपाल तुमाने, महापौर दयाशंकर तिवारी, मा. श्री. विकास खरगे, प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालय, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ.  एन. रामबाबू,  प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य‍जीव) नितीन काकोडकर, प्रधान सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे इत्‍यादींसह अनेक आमदार प्रामुख्‍याने उपस्थित होते.

उध्‍दव ठाकरे म्‍हणाले, विदर्भातील जनतेला विकास कामापासून दूर ठेवले जात आहे, असा गैरसमज लोकांच्‍या मनात आहे. समृद्धी महामार्ग, गोसेखुर्द, गोरेवाडा अशी अनेक विकासाची कामे विदर्भात सुरू असून लवकरच नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले जाणार आहे. आपल्‍या भाषणातून आदिवासी भागातील जनतेला वचन देताना ते म्‍हणाले, त्‍यांच्‍या रूढी, परपंरा, संस्‍कृतीचे जतन व संवर्धन करणारे केंद्र स्‍थापित केले जाईल. गोंडवाना थीम पार्कच्‍या प्रकल्‍पावर काम सुरू असून आता विदर्भातील पर्यटनाला चालना देण्‍यासाठी विविध प्रकल्‍प राबवले जातील, असे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी दिले. गोरेवाडा प्रकल्‍पाचे कौतूक करतानाच त्‍यांनी अनिल देशमुख यांच्‍या पुढाकाराने सुरू झालेल्‍या सायबर पोलिस स्‍टेशन व कारागृह पर्यटनाचेही कौतूक केले.

मेळघाटातील आदिवासी बांधवांच्‍या प्रश्‍नांना वाचा फोडताना अनिल देशमुख म्‍हणाले, मेळघाट आदिवासी बांधवांचे  अनेक वर्षापासून प्रश्‍न प्रलंबित आहे. त्‍यांचे संपूर्ण जीवन परंपरागत वनीकरणावर अवलंबून असते. पण वर्षभर हाताला काम नसल्‍यामुळे ते शहराकडे स्‍थलांतरण करतात. पण शहरांचीही परिस्थिती वाईट असून या आदिवासी बांधवांचे प्रश्‍न प्राधान्‍याने सोडवावे, अशी विनंती त्‍यांनी मुख्‍यमंत्र्यांना आपल्‍या भाषणातून केली.
डॉ. नितीन राऊत यांनी विदर्भात जंगल, खान पर्यटनाला भरपूर वाव असल्‍याचे सांगितले. गोरेवाडा उद्यानामुळे जगभरातील पर्यटक नागपुरात येणार असून भविष्‍यात त्‍यांच्‍यासाठी मुलभूत सुविधा उपलब्‍ध करून देणे गरजेचे ठरणार आहे. त्‍यामुळे रोजगाराच्‍या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असून त्‍याकरिता प्रशिक्षण संस्‍थांची गरज भासणार असल्‍याचे सांगितले.

सुनील केदार यांनी गोरेवाडा उद्यान हे नागपूरसारख्‍या वाढलेल्‍या शहरासाठी 'लग्‍ज ऑफ सिटी' ठरेल, असे सांगितले.
मिलिंद म्‍हैसकर म्‍हणाले, वनखात्‍याला आतापर्यंत विविध कारणांमुळे आरोपीच्‍या पिंज-यात उभे केले जात होते पण उध्‍दव ठाकरे सरकारच्‍या धोरणामुळे वनविभागाला सन्‍माननीय वागणूक मिळत असून विविध कामे झपाट्याने मार्गी लागली आहेत. वने व पर्यावरण यासंदर्भात अनेक मोठे निर्णय या काळात घेण्‍यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व्‍यवस्‍थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी केले. मिलिंद म्‍हैसकर यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. सूत्रसंचालन श्‍वेता शेलगांवकर यांनी तर आभार प्रदर्शन ऋषीकेश रंजन यांनी केले.

पर्यटकांना आकर्षित करण्‍याची जबाबदारी आपली - आदित्‍य ठाकरे
गोरेवाडाच्‍या प्रकल्‍पाचे उद्घाटनामुळे या परिसराच्‍या विकासासाठी जे स्‍वप्‍न पाहिले होते, ते पूर्ण झाल्‍याचा आज आनंद होत आहे. त्‍यासाठी वनखात्‍याचे अभिनंदन पाहिजते. त्‍यांनी विकास म्‍हणजे नक्‍की काय असते, याचा यान‍िमिताने आदर्श ठेवला आहे. एक वर्षात वने व पर्यावरण खात्‍याला महाआघाडी सरकारमुळे सन्‍माननीय वागणूक मिळाली असे आदित्‍य ठाकरे म्‍हणाले. मध्‍य भारतातील मोठे पर्यटन केंद्र नागपुरात स्‍थापित झाले पण आता येथे अधिकधिक पर्यटक कसे आकर्षित करण्‍याची जबाबदारी आपली आहे, असे ते म्‍हणाले.

भूलथापांना बळी पडू नका - संजय राठोड
गोरेवाडा उद्यानाचे काम दहा वर्षापासून थांबलेले होते. मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनासारख्‍या कठीण काळातही या प्रकल्‍पाचे काम पूर्ण केले. साडे चारशे कोटी रुपयांच्‍या या प्रकल्‍पापेळी केवळ 100 कोटी रुपयांचेच काम पूर्ण झाले असून उर्वरित निधी मिळावा, अशी मागणी त्‍यांनी यावेळी केली. देशातील सर्वात मोठे प्राणी उद्यान ज्‍याची ओळख निर्माण होणार आहे, त्‍या गोरेवाडा उद्यानाचे काम दोन वर्षात पूर्ण करण्‍याचा मानसही त्‍यांनी यावेळी बोलून दाखवला.  गोरेवाडा उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्‍यासंदर्भात विरोध होत असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर बोलताना संजय राठोड म्‍हणाले, आधीपासून उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्‍याचे ठरले होते. मागील दहा वर्षात दुस-या कोणत्‍याही नावाचा विचार झालेला नव्‍हता. त्‍यामुळे कोणत्‍याही भूलथापांना बळी पडू नये, दुस-यांच्‍या खा़द्यावर बंदूक ठेवून विरोध करू नका, असे आवाहन त्‍यांनी केले.

व्याघ्र दर्शनाने सुखावले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इंडियन सफारी दरम्यान राजकुमार नामक वाघ, बिबट आणि चार अस्वलाच्या पिल्लांचे दर्शन झाले. गोरेवाडा प्राणी उद्यानातील प्राण्यांच्या अशा मुक्त संचाराने ते सुखावले. ते म्हणाले, गोरेवाडा हे प्राणी संग्रहालय नाही तर उद्यान आहे. येथे प्राणी मुक्तपणे फिरताना बघून आनंद झाला. गाईडने राजकुमार वाघ हा साडेपाच वर्षांचा असून माणसाळलेला आहे. तो एका वरातीत देखील गेला होता अशी माहिती दिली. बरे झाले त्याचा त्यादिवशी उपवास होता नाही तर तो पंगतीत जेवला असता अशी त्यावर मुख्यमंत्री यांनी कोटी केली.