दिव्‍यांगांच्‍या 'खादी शो'ला उत्‍स्फूर्त प्रतिसाद

January 20,2021

नागपूर : २० जानेवारी -   ये जिंदगी फाउंडेशनच्‍यावतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या स्‍नेहधागा खादी शो ला आज दुस-या दिवशीही उत्‍स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खादीच्‍या चाहत्‍यांच्‍या आग्रहात्‍सव गोंडवाना गॅलरी रामदासपेठ येथे आयोजित हे प्रदर्शन उद्या म्‍हणजे गुरूवार, 21 जानेवारी रोजी देखील खुले राहणार आहे. 

ये जिंदगी फाउंडेशन ही दिव्‍यांग व त्‍यांच्‍या कुटूंबाच्‍या सहभागातून उभी झालेली सामाजिक संस्‍था असून 'स्‍नेहधागा' या ब्रांड नावाअंतर्गत दिव्‍यांगांनी खादीच्‍या कपड्यांवर वारली पेटींग करून साड्या, कुर्ते, सलवार कमीज, प्‍लाझो, ओढण्‍या, स्‍टोल, ज्‍वेलरी तयार केली जाते. या वस्‍तू व वस्‍त्रांचे प्रदर्शन ये जिंदगी फाउंडेशनच्‍या संचालिका स्‍नेहल कश्‍यप यांनी 19 ते 20 जानेवारी दरम्‍यान गोंडवानी गॅलरी, रामदासपेठ येथे 'खादी शो' या शीर्षकांतर्गत प्रदर्शन आयोजित केले आहे. आज दुस-या दिवशी या प्रदर्शनाला प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर, कवयित्री सना पंडित, परिणीता फुके, हेमंत गडकरी, सायबर सेलचे अशोक बागुल, नानू नेवरे, सीमा सराफ इत्‍यादींनी भेट दिली. सर्व मान्‍यवरांनी दिव्‍यांग मुलांनी कपड्यांवर चितारलेल्‍या वारली पेंटींगचे कौतूक केले. हे प्रदर्शन प्रचंड मागणीनंतर 21 जानेवारी रोजी सकाळी 12 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे, अशी माहिती स्‍नेहल कश्‍यप यांनी दिली