निलेश राणे भाजपचे प्रदेश सचिव

January 20,2021

मुंबई : २० जानेवारी - महाविकास आघाडी सरकारवर  या ना त्यामुद्यावरून ट्वीट करून टीकास्त्र सोडणारे नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे  यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. निलेश राणे यांची भाजप प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

ठाकरे सरकार आणि शिवसेनेच्या नेत्यावर सडकून टीका करणाऱ्या निलेश राणे यांच्यावर भाजपने आता नवीन जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांची थेट प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. निलेश राणे लोकसभा निवडणूक पराभूत झाले होते. त्यानंतर वडील नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्थापन केला होता.

त्यावेळी निलेश राणे हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले होते. परंतु, नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही मुलांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा पासून निलेश राणे हे ट्वीटरवरून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यावर एकेरी शब्दांत सडकून टीका करताना आढलून आले. आता भाजपने त्यांच्याकडे प्रदेश सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे.

नारायण राणे यांना वाय दर्जाची सुरक्षा

राज्यातील आजी माजी मंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने सरकारने जाहीर केला होता. भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत सुद्धा कपात करण्यात आली होती. त्याचबरोबर नारायण राणे यांच्याकडे असलेली वाय दर्जाची सुरक्षा काढून घेतली होती. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे भाजपने सडकून टीका केली होती.

पण, आता केंद्राने ठाकरे सरकारला दणका दिला आहे. नारायण राणे यांना केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. नारायण राणे यांच्या ताफ्यात आता 12 सीआयएस एफचे जवान तैनात असणार आहे.