साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरेच राहणार

January 20,2021

मुंबई : २० जानेवारी - राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत येणाऱ्या संस्थेपैकी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे राहतील असा निर्णय झाला आहे. मोरे यांनी दिलेला राजीनामा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे २६ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार मोरेच यापुढे कार्यभार सांभाळतील असे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर विश्वकोश निर्मीती मंडळाच्या अध्यक्षपदाचा दिलीप करंबळेकर यांनी राजीनामा दिला होता. गेल्यावर्षी २ जानेवारीला हा राजीनामा दिल्यानंतर ३० जुलैला तो संमत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र  याच काळात साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊनही त्याबाबत निर्णय झाला नव्हता. 

राज्य सरकारद्वारे राजीनामा अस्वीकारार्ह असल्याचे कळवण्यात आल्याने हा पदभार मान्य असल्याचे सरकारला कळविल्याचे सदानंद मोरे यांनी सांगितले. 

येत्या काळात आता पुन्हा जोमाने काम करण्यात येणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मराठी भाषा  गौरव दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या निमित्ताने साहित्य क्षेत्रामध्ये गेले काही महिने आलेली मरगळ झटकून पुन्हा  बैठकांनाही सुरुवात होईल, अशी अशा आहे. गेल्या काही काळामध्ये आधी निर्णय घेण्यात आलेल्या प्रकल्पांवर काम सुरु आहे. कोरोना काळामध्ये  या कामावरही निर्बंध आले होते. मात्र अध्यक्षांमुळे रखडलेल्या कामाबद्दलची  विचारणा होऊ शकेल, अशी शक्यता आहे.