दोन जिवलग मित्रांचा रस्ते अपघातात मृत्यू

January 20,2021

चंद्रपूर : २० जानेवारी - बालपणापासूनची जिवलग मैत्री असलेल्या दोघांचा एकाच खड्ड्यात काही तासांच्या अंतराने पडून मृत्यू झाला. गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा-किरमिरी  मार्गावर रात्री घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गोकुळ अंबादास झाडे (३०) व नितेश गजानन झाडे (३१) अशी या मित्रांची नावे आहेत. 

गोकुळ  व नितेश झाडे हे दोन जिवलग मित्र किरमिरी या गावात एका नातेवाईकाच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दोघेही आपल्या दुचाकीने गेले होते. महत्वाचे काम आल्याने  कार्यक्रम आटोपून आधी गोकुळ दुचाकीने गावी परतत असताना हिवरा- किरमिरी मार्गावर सुरु असलेल्या रास्ता बांधकामात पाइपसाठी खोदलेल्या खड्ड्यात तो दुचाकीसह कोसळला  व गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने चंद्रपुरात दाखल करण्यात आले. निठून नागपूरला हलविले. मित्राच्या अपघाताची माहिती  मिळताच नितेश दुचाकीने निघाला. दुर्दैवाने त्याचीही दुचाकी त्याच खड्ड्यात कोसळली. त्यालाही चंद्रपूरला  दाखल करण्यात आले. याचदरम्यान गोकुळच्या नागपुरात तर नितेशचा चंद्रपुरात उपचारादरम्यान मृत्यू  झाला. दोन जिवलग मित्रांच्या  अशा पद्धतीने मृत्यू झाल्याची वार्ता कळताच धाबा गावात शोककळा पसरली. 

धाबा येथील जुन्या बेघर वस्तीत नितेश व गोकुळ हे दोघेही मित्र वास्तव्यास होते. नितेशचं साक्षगंध नुकतेच पार पडले होते. फेब्रुवारी महिन्यात  त्याचा विवाह होता. पण त्याआधीच काळाने आपला डाव साधला.