मुंबईतील शेतकरी आंदोलनात शरद पवार सहभागी होणार

January 20,2021

मुंबई : २० जानेवारी - केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीत शेतकऱ्यांचं बेमुदत आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत तीन दिवसांचे आंदोलन होत असून या आंदोलनात शरद पवार सहभागी होणार आहेत.

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४ व २५ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे. या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे २५ जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली. मलिक यांनी या मागची पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्यांना विरोध केला असून शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला आहे. आता या आंदोलनात महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते व स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा सहभागी होणार आहेत, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.