चंद्रपूरच्या अपक्ष आमदारांनी पकडल्या दारू तस्करी करणाऱ्या सात गाड्या

January 20,2021

चंद्रपूर : २० जानेवारी - चंद्रपुरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर-चंद्रपूर मार्गावर दारु तस्करी करणाऱ्या सहा बोलेरो पिक अप गाड्या आणि या गाड्यांना पायलट करणारी एक महिंद्रा गाडी पकडली. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केवळ कागदावर असल्याचे वारंवार बोलले जाते, मात्र याचा धडधडीत पुरावा काल  पाहायला मिळाला.

आमदार किशोर जोरगेवार यांनी एन्ट्री पॉईंटवर पाळत ठेवून शहरात येणाऱ्या सहा बोलेरो पिकअप वाहनांना आणि त्यांना पायलट करणाऱ्या एका गाडीला अडवले. चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुप्त माहितीवर आधारित हे अभियान राबवले. या सर्व गाड्यांमध्ये देशी दारुचे बॉक्स भरलेले होते. दारु भरलेली ही सर्व वाहने पडोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गेले काही महिने जिल्ह्यातील दारुबंदी विरोधातील पोलीस कारवाई थंडावल्याची कुजबुज होती आणि त्याचा प्रत्यय या कारवाईने समोर आला. मार्गातील अनेक पोलिस ठाणे आणि नाकेबंदी चुकवून चंद्रपूर शहराच्या अगदी जवळ या गाड्या पोहोचल्याने पोलीस बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान या कारवाईची माहिती देण्यासाठी फोन केल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत अपमानास्पद भाषेत संभाषण केल्याची बाब आमदार जोरगेवार यांनी बोलून दाखवली आहे. सध्या पडोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी या घटनेतील वाहक-चालकांना ताब्यात घेतले आहे.