भंडारा जळीतकांडाचा अहवाल सादर कर्मचाऱ्यांवर टाकली जबाबदारी

January 20,2021

नागपूर : २० जानेवारी - महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला चटका लावणाऱ्या भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीचा अहवाल समोर आला आहे. 9 जानेवारी रोजी रुग्णालायत नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण राज्य सुन्न करणाऱ्या या आगीच्या घटनेसाठी शॉर्ट सर्किटचं कारण देण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्यांनी 50 पानांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये दोन परिचारकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचं नमूद करण्यात आलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होणार आहे.

भंडारा रुग्णालयातील आगीनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली आहे. त्यांनी हा 50 पानांचा अहवाल सादर केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज घडना घडली त्यावेळी वर्तवण्यात आला होता. अहवालातही शॉर्ट सर्किटचाच उल्लेख करण्यात आला आहे. तसंच रुग्णालयात स्टाफ कमी होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग लागली त्यावेळी तिथे कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे या घटनेबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवण्यात आलं आहे.

दुर्लक्ष करणाऱ्यांना शिक्षा होणारच : राजेश टोपे

या अहवालाचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभागस्तरावर केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अहवाल सादर केला जाईल. अहवालाच्या निष्कर्षाच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्यांना शिक्षा होईलच यात शंका नाही, मात्र ही सगळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी ओव्हरअल प्रयत्नशील राहू, असं आश्वासनही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे.