मराठा आरक्षण प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

January 20,2021

मुंबई : २० जानेवारी - मराठा आरक्षण प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, आज होणारी सुनावणी पुढील महिन्यात ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय लांबत चालल्याची स्थिती आहे. दरम्यान, या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. “राज्य सरकार या प्रकरणात काय करू इच्छिते ते लक्षात येत नाही,” असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याच्या वृत्तानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले,”राज्य सरकार ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या प्रकरणात घोळ घालतंय, त्यावरुन सरकारच्या मनात काय आहे तेच कळत नाही. काही पिटीशन दाखल होतात आणि मग त्यासाठी राज्य सरकार वेळ मागत आहे. राज्य सरकार या प्रकरणात काय करू इच्छिते ते लक्षात येत नाही. मराठा आरक्षणासंदर्भात भाजपा नेत्यांचं समाधान करण्यापेक्षा मराठा समाजाचं समाधान करावं,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

“मराठा आरक्षण संदर्भातली जी स्थिती आहे, ती केवळ सरकारच्या घोळामुळे आहे. सरकार ठामपणे एक भूमिका मांडत नाही. प्रत्येक वेळेस एक नवीन भूमिका मांडत आहे. सरकारच्या दोन मांडण्यांमध्ये प्रचंड फरक आहे. सरकारची कमिटी कुणाशी बोलते, काय निर्णय होतो काहीच कळत नाही,” अशी शंका फडणवीस यांनी उपस्थित केली. “भाजपाचं समाधान करण्यापेक्षा मराठा समाजाचं समाधान करा. तुमच्या नाकर्तेपणामुळं ज्यांना आरक्षण मिळत नाही, त्यांचं समाधान करा. आमच्या समाधानाचा विषय तुम्ही सोडून द्या, आम्हाला तर कधी तुम्ही चर्चेलाही बोलावलं नाही. आमची तुमच्या विषयी काही तक्रार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा पण मराठा समाजाला न्याय द्या,” अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद दिसत आहेत. कुठलाही समन्वय दिसत नाही. कोण कुठला निर्णय करतंय, कुणालाच माहिती नाही. राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. सर्व प्रकारच्या आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावा, अशी कृती राज्य सरकारची दिसत आहे. त्यातूनच एमपीएससी आणि राज्य सरकारचा घोळ तयार झाला आहे,” असा आरोप फडणवीस यांनी केला.