दारू वाटप करणाऱ्या उमेदवाराला पाडण्यासाठी महिलांचा पुढाकार

January 20,2021

गडचिरोली : २० जानेवारी - गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड या सहा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज सुरु आहे.  ही निवडणूक दारूमुक्त व्हावी, यासाठी पाच तालुक्यातील २३१ गावांनी पुढाकार घेतला आहे. या गावांनी ठराव पत्रावर स्वाक्षर्या करीत दारूचे वाटप करणार्या उमेदवाराला नक्कीच पाडू, असा संकल्प केला आहे. सहा तालुक्यातील १६0४ उमेदवारांनीही निवडणूक काळात दारूचे वाटप करणार नसल्याचे संकल्प पत्रावर लिहून दिले आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूकसुद्धा दारूमुक्त करण्यासाठी २३१ गावांनी पुढाकार घेतला आहे. गावाच्या विकासासाठी दारूमुक्त निवडणूक आवश्यक आहे. निवडणूक काळात दारूचे वाटप झाल्यास दारूविक्री बंद असलेल्या गावातसुद्धा दारू सुरू होण्याची शक्यता आहे. दारूचे आमिष दाखवून निवडून येणारा उमेदवार गाव विकासात अडचण निर्माण करू शकतो. त्यासाठी या गावांनी दारूमुक्त निवडणुकीचा ठराव घेतला आहे. ठरावात उमेदवार दारू पिणारा नसावा, मतांसाठी दारूचे वाटप करू नये आणि मतदारांनी दारूच्या नशेत मतदान करू नये. ही तीन मुद्दे केंद्रस्थानी ठेवले आहेत. त्यानुसार या गावांनी दारू पिणारा नको आणि पाजणाराही नको, दारूचे वाटप न करणार्या , निर्व्यसनी उमेदवारालाच आमचे मत, असा निर्णय या गावांनी घेतला आहे. 

पहिल्या टप्यात पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान 'दारूमुक्त निवडणुक' अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. देसाईगंज २५,आरमोरी २८,कुरखेडा ३0, कोरची ४५,धानोरा ४६, गडचिरोली ६२ अशा एकूण २३६ गावांनी ठराव घेऊन दारूमुक्त निवडणुकीसाठी यशस्वी प्रयत्न केले होते. त्याच प्रमाणे दुसर्या टप्यातील निवडणुकीसाठी चामोर्शी ४१, मुलचेरा ४३, एटापल्ली ४७, अहेरी ३७, सिरोंचा ६३ अशा एकूण २३१ गावांनी प्रयत्न सुरु केले आहे. आतापयर्ंत जिल्ह्यातील एकूण ४६७ गावांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी ठराव घेतला तर ३२७९ उमेदवारांनी संकल्पपत्रावर स्वाक्षरी केली आहे. त्याचप्रमाणे सहा तालुक्यातील १६0४ उमेदवारांनी देखील दारूचे वाटप न करण्याचा संकल्प केला आहे. यात चामोर्शीतील ४२५ उमेदवार, मुलचेरा २३४, एटापल्ली २३३, अहेरी १५८ व सिरोंचातील ५५४ उमेदवारांनी संकल्प पत्रावर स्वाक्षरी केली आहे.