मी कुणालाही घाबरत नाही - राहुल गांधी

January 20,2021

नवी दिल्ली : २० जानेवारी - माझी प्रतिमा स्वच्छ आहे, त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. ते माझ्यावर कोणतेच आरोप करू शकत नाहीत; फक्त गोळी मारू शकतात, असे उद्गार कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज काढले. राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे उपस्थित करण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेसने आज ‘खेती का खून, तीन काले कानून’ या शीर्षकाखालील एक पुस्तिका जारी केली. त्यानंतर कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत राहुल गांधी बोलत होते.

चीन, शेतकरी आंदोलन आणि कोरोनाच्या मुद्यावर राहुल गांधी देशवासीयांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज एकामागे एक केलेल्या ट्विटमधून केला होता. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, शेतकर्यांना वस्तुस्थिती माहिती आहे. राहुल गांधी काय करतात, हे सुद्धा सर्व शेतकर्यांना माहिती आहे. भट्टा परसोलमध्ये नड्डाजी गेले नव्हते, तर मी गेलो होतो. माझी प्रतिमा स्वच्छ आहे, त्यामुळे मी ना नरेंद्र मोदींना घाबरतो, ना भाजपाच्या अन्य नेत्यांना. ते माझ्यावर कोणतेच आरोप करू शकत नाहीत, माझी प्रतिमा मलिन करू शकत नाही, जास्तीतजास्त ते मला गोळी मारू शकतात.

प्रत्येक उद्योगात चार-पाच लोकांचा एकाधिकार वाढत आहे, म्हणजे देशाचे चार-पाच नवे मालक तयार होत आहे, असा आरोप करत गांधी म्हणाले की, आतापर्यंत शेतीवर कोणाचा एकाधिकार नव्हता. त्यामुळे त्याचा फायदा शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेला मिळत होता. आता मात्र सरकार देशातील शेतीही चार-पाच लोकांच्या ताब्यात देण्याची तयारी करत आहे. यामुळे शेतकर्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळणार नाही आणि नंतर याची किंमत सर्वसामान्य जनतेला वाढीव किंमतीच्या माध्यमातून चुकवावी लागेल, ज्याची आता कोणाला कल्पना नाही.

कृषी कायदे म्हणजे फक्त शेतकर्यांवरचा हल्ला नाही, तर मध्यमवर्ग आणि तरुणांवरचा हल्ला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गांधी म्हणाले की, पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी या देशाचे रक्षक आहेत. देशातील कृषी क्षेत्र काही मोजक्या लोकांच्या हातात जाण्यापासून रो़खण्यासाठी ते संघर्ष करत आहे. त्यामुळे देशातील जनतेने त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे.

शेतकर्यांच्या आंदोलनाच्या मुद्यावर सरकार चालढकल करत आहे, असा आरोप करत गांधी म्हणाले की, शेतकर्यांना थकवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, पण देशातील शेतकरी पंतप्रधान मोदींपेक्षा हुषार आहे. तो माघार घेणार नाही. त्यामुळे कृषी कायदे मागे घेणे हाच या आंदोलनावरचा तोडगा आहे.

मी देशभक्त आणि स्वच्छ प्रतिमेचा नागरिक असल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे वारंवार उपस्थित करत राहील, त्यापासून मला कोणी रोखू शकत नाही, असे ते म्हणाले.