पर्यटन वृद्धीसाठी विधानभवन पर्यटकांसाठी खुले करणार

January 20,2021

मुंबई : २० जानेवारी - राज्यातील पर्यटनवृध्दीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्त बैठकीत घेतला.

यासंदर्भात विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटन मंत्री ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळाला अनन्यसाधारण परंपरा लाभलेली आहे. या विधानमंडळातून अनेक दिग्गजांनी लोकसेवेची कारकीर्द गाजविली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने संमत केलेले अनेक कायदे देशपातळीवरही स्वीकारले गेले आहेत. गौरवशाली इतिहास लाभलेली वास्तू सामान्य जनतेला बघण्यासाठी खुली करणे गरजेचे आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल.