जागेच्या वादात शेजाऱ्याची भोसकून केली हत्या

January 20,2021

नागपूर : २० जानेवारी - घराच्या जागेच्या वादातून एकमेकांच्या शेजारी राहणार्या दोन कुटुंबामध्ये वाद झाला. या वादात एका कुटुंबातील लोकांनी शेजारच्या तरुणाची चाकूने भोकसून हत्या केली. ही थरारक घटना लोहारी सावंगा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील सहा जणांना अटक केली. शरद बाबाराव चापले असे मृतक तरुणाचे तर गौरव रत्नाकर सावरकर (१९), विक्की रत्नाकर सावरकर (२२), र्शावण किसन सावरकर (१९), कल्पना रत्नाकर सावरकर (४५), रत्नाकर बाबुराव सावरकर (५२) व दिनेश बाबुराव सावरकर (५0) सर्व रा. लोहारी सावंगा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

मृतक व आरोपी हे एकदुसर्यांचे शेजारी आहेत. त्यांच्यामध्ये घराच्या जागेवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात गेला असून खटला सुरू आहे. घटनेच्या दिवशी आरोपी रत्नाकर याने मृतकाच्या घराची भिंत तोडून आपल्या घराचे कॉलम बांधले होते. त्यामुळे मृतकाने आरोपीला माझ्या घराची भिंत फोडून घराला लागून कॉलम का बांधले, असे हटकले होते. त्यावरून रत्नाकर, कल्पना यांनी शरद याची कॉलर पकडून धक्काबुक्की करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपी दुचाकीने शेतात गुरांना चारापाणी करायला गेला. तेथून परत येत असताना आरोपी कल्पना रत्नाकर सावरकर यांनी शरदला पकडून ठेवले व गौरव, विक्की, र्शावण यांनी चाकूने सपासप वार करून जखमी केले. घटनेची माहिती शरदची बहीण सविता बाबाराव चापले (३0) हिला होताच तिने घटनास्थळाकडे धाव घेतली, तेव्हा चाकूने वार करणे सुरूच होते. शरदला उपचारार्थ नागपूर येथे हलविले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सविताच्या तक्रारीवरून जलालखेडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून आरोपींना अटक केली. 

पोलिसात तक्रार केल्याने चाकूहल्ला

घरबांधकाम करताना पिल्लर शरद याच्या जागेत गेल्याने त्याने गौरव व त्याच्या आई-वडिलांशी भांडण केले. याची तक्रार गौरव यांच्या आई-वडिलांनी पोलिस स्टेशनला दिल्याने शरदने गौरव व त्यांच्या आई-वडिलांवर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केल्याची तक्रार गौरवने पोलिसात दिली होती.