मैत्रिणीच्या नवऱ्यानेच केला अतिप्रसंग, पोलिसात गुन्हा दाखल

January 20,2021

नागपूर : २० जानेवारी - शहरातील गिट्टीखदान पोलिस ठाणे हद्दीत अतिप्रसंगाचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्घ गुन्हा दाखल केला आहे. पीडित युवती ही राजस्थान येथील जयपूर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्यानेच  अतिप्रसंग केला. 

मंगळवारी या अतिप्रसंगाचे हे प्रकरण गिट्टीखदान पोलिस ठाण्यात दाखल झाले. याप्रकरणी तीनही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली आहे. पीडिता ही २३ वर्षांची आहे. ती नागपूर शहरातील निवासी या तिच्या मैत्रिणीकडे आली होती. सोमवारी आणि मंगळवारी दरम्यान, रात्री तिच्या मैत्रिणीचा नवरा जुनेद खान याने संधी बघत त्याचे मित्र जरीन आणि सोनू याच्या मदतीने पीडितेवर अतिप्रसंग केला. घटनेसंदर्भात कुणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या पीडितेने तिच्या मैत्रिणीला माहिती दिली. विशेष म्हणजे, घटनेच्यावेळी तिची मैत्रीण अर्थात पीडिता ज्या मैत्रिणीच्या घरी राहायला आली होती ती मैत्रीण घरीच होती. परंतु, ती दुसर्या खोलीत झोपली होती. त्यामुळे तिला या प्रकरणाची माहितीही कळली नाही. घटनेनंतर पीडितेवर तक्रार न करण्याचा दबाव टाकण्यात आला होता. परंतु, हिंमत करून या पीडितेने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.