कामावरून काढल्याने सुरक्षारक्षक सहकुटुंब बेमुदत उपोषणावर बसले

January 20,2021

गोंदिया : २० जानेवारी - तेरा वर्ष कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून काम केल्यावर कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन बंद करण्यात आले. त्यामुळे सुरक्षारक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. आपल्या न्याय मागणीसाठी बिरसीवासी सहकुटूंब मंगळवार, 19 जानेवरीपासून विशाल सुरक्षा मजदूर संघटनेच्या नेतृत्वात बिरसी विमानतळासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत.2007 पासून बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणाला सुरुवात झाले. तेव्हा स्थानिक नागरिकांना प्रकल्पातील रोजगारात सामावून घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. 

त्यानुसार स्थानिक नागरिक या प्रकल्पात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पात बिरसी, कामठा, झिलमिली व परसवाडा येथील शेतजमिनी व घरे अधिग्रहीत करण्यात आली होती. परंतु येथील नागरिकांना पाहिजे त्या प्रमाणात प्रकल्पाद्वारे रोजगार उपलब्ध झाला नाही. हा प्रकल्पबाधित ग्रामस्थांवर मोठा अन्याय आहे. त्यातच आता 13 वर्ष प्रकल्पात सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्या स्थानिक नागरिकांना कोणतीही सुचना न देता कामावरुन बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजेे, आजवर प्रकल्पबाधीत ग्रामस्थांनी व सुरक्षारक्षकांनी आपली समस्या, मागणी लोकप्रतिनिधी, विमानतळ व जिल्हा प्रशासनासमोर मांडून न्याय मागितला. मात्र सर्वांचेच याकडे दुर्लक्ष झाल्याने आपल्या न्याय मागणीसाठी सुरक्षारक्षक तसेच प्रकल्पात अधिग्रहित झालेल्या प्रकल्पपीडितांनी मंगळवारपासून सहकुटूंब बिरसी विमानतळासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

या आंदोलनाची जिल्हा व विमानतळ प्रशासनाने पहिल्या दिवशी जरी दखल घेतली नसली तरी या आंदोलनाला समता संग्राम परिषदेचे संयोजक सतीश बनसोडे, कार्यवाहक सुरेंद्र महाजन, तालुकाध्यक्ष प्रकाश वासनिक, महासचिव राजू राहुलकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र बोरकर, कार्यवाहक महेंद्र गजभिये, आम आदमी पक्षाचे जिल्हा संयोजक पुरुषोत्तम मोदी, उमेश दमरहे, मोगराचे सरपंच दिलीप मुंडले यांनी भेट देऊन आपला संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

विशाल सुरक्षा कंत्राटी मजदूर संघटनेचे अध्यक्ष अनिल भेंडारकर यांनी सांगितले की, बिरसी विमानतळ प्रकल्पाने आमच्यावर अन्याय करून उपासमारीची पाळी आणली आहे. त्यासाठी आम्ही आम्हाला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे सांगितले.