गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारोह आता आभासी पद्धतीने गडचिरोलीत होणार

January 20,2021

गडचिरोली : २० जानेवारी - गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ यंदा पहिल्यांदाच चंद्रपुरात होणार होता. मात्र, आता तो आभासी पध्दतीने गडचिरोलीतून होत असून, अगदी मोजक्या मान्यवरांसह विद्यापीठाच्या सभागृहात ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे असणार आहेत. 

गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2019-20 च्या विविध पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके तसेच पदवी बहाल करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ येत्या 28 जानेवारीला सकाळी 11 वाजता चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेला होता. मात्र, आता हा दीक्षांत समारंभ चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी ऐवजी गोंडवाना विद्यापीठात 28 जानेवारीलाच सकाळी 11 वाजता आभासी पद्धतीने घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या फेसबुक पेजवर त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. 

या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग बंगलोरचे संचालक डॉ. एस. सी. शर्मा तसेच गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या उपस्थितीत आभासी उपस्थितीत होत असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव (प्र.) डॉ. अनिल चिताडे यांनी दिली आहे. 

प्रारंभी, कुलगुरू डॉ. वरखेडी आपले मनोगत व्यक्त करतील. प्रमुख अतिथींचे भाषण होईल. अधिष्ठाता आपले अहवाल मांडतील आणि शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मागदर्शन करतील. त्यानंतर मोजक्याच पदवीधारकांना पदवी प्रदान केली जाणार आहे.