अमरावतीची प्रीती देशमुख पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाणार

January 20,2021

अमरावती : २० जानेवारी - पॅरिसमध्ये सन 2024 मध्ये होणाऱ्या  ऑलिंपिक आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रीती प्रमोद देशमुख हिची वेटलिफ्टिंग संघात निवड झाली असून संपूर्ण महराष्ट्रातून वेटलिफ्टिंगसाठी निवड होणारी ती एकमेव खेळाडू आहे. प्रीती देशमुख ही बी.एससी. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी असून सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. महाविद्यालयाकडून सतत मिळणारे प्रोत्साहन व सहकार्यामुळे तिने अकरावीपासूनच आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित केले. बारावीला असताना ‘खेलो इंडिया’ मध्ये तिला पदक प्राप्त झाले आहे. भारताच्या वेटलिफ्टिंग संघात 25 खेळाडूंचा समावेश असून अमरावतीच्या खेळाडूची या संघात निवड होणे ही अमरावतीकरांसाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. 

मुलींच्या वेटलिफ्टिंग संघात 85 किलो वजन गटात समावेश झालेल्या प्रीती हिचे नेताजी सुभाष नॅशनल इंस्टिट्यूट पतियाळा येथे प्रशिक्षण सुरु झाले आहे. त्यामुळे या यशाबद्धल शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी स्वतः दुरध्वनीद्वारे संपर्क साधून तिचे व तिच्या कुटुंबाचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. वि. गो. ठाकरे यांनी स्वतः प्रीतीच्या पतियाळा येथील प्रशिक्षकांशी संपर्क साधून महाविद्यालयाच्या वतीने तिला सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.