तुमसरमध्ये भरदिवसा सराईत गुंडांवर केला गोळीबार

January 20,2021

भंडारा : २० जानेवारी - गुन्हेगारीत अत्यंत संवेदनशील असलेले तुमसर शहर  पुन्हा हादरले. दिवसाढवळय़ा एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने भंडारा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर त्याला नागपूरच्या रुग्णालयात नेण्यात आले. वर्चस्वाच्या लढाईतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

संतोष चंदन डहाट (२८) रा. आंबेडकर वॉर्ड, तुमसर असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत.

मंगळवारी सकाळपासून आंबेडकर वॉर्डातील एका रिकाम्या जागेत संतोष डहाट हा आपल्या साथीदारांसह जुगार खेळत होता. दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास त्याठिकाणी पाच ते सहा युवक आले. त्यांनी संतोषवर बेछुट गोळीबार केला. त्यातील तीन गोळ्या हुकल्या. तर चवथी गोळी त्याच्या छातीवर लागली. यात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ही घटना घडताच संतोषचे साथीदार घटनास्थळावरुन पळून गेले. त्यानंतर पाच ते सहा युवकांनी संतोषवर चाकुने वार केले. व पळून गेले. 

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतोषला भंडारा येथील रुग्णालयात हलविले. परंतु, तो गंभीर जखमी असल्याने त्याला नागपूरला नेण्यात आले.

संतोषवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार आहे. आपसी वैमनस्यातून वर्चस्व गाजविण्यासाठी हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा अधिक तपास तुमसर पोलिस करीत आहेत.

तुमसर शहरात अधुनमधून गुन्हेगारी डोके वर काढत असते. परंतु, ही गुन्हेगारी हद्दपार करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक सतत दहशतीत असतात.