नागपूरकरांमुळेच माझ्या हातून मोठमोठी कामे घडली - नितीन गडकरी यांचे भावपूर्ण उद्गार

January 17,2021

नागपूर : १७ जानेवारी - नागपूरकरांनी मला सेवेची संधी दिल्यामुळेच मी नागपुरात आणि देशभरात मोठमोठी कामे करू शकलो. नागपुरातही आज डबल डेकर पूल बांधला, फुटाळ्यावर जागतिक दर्जाचे कारंजे होणार आहेत, ब्रॉडगेज मेट्रोही लवकरच लोकांच्या सेवेसाठी येणार आहे. ही सर्व कामे लोकांमुळेच होऊ शकली, त्यामुळे या कामाचे श्रेय नागपूरकरांचे आहे. असे  उद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. 

पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे नितीन गडकरी यांना आज नलिनी बाळकृष्ण देवपुजारी स्मृती जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. शक्तिपीठ रामनगर येथे झालेल्या या कार्यक‘माला तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी मुख्यमंत्री  आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचन गडकरी, पद्मगंधा प्रतिष्ठानच्या शुभांगी भडभडे, कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरु, डॉ. पंकज चांदे, डॉ. सतीश देवपुजारी आदी उपस्थित होते. 

अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्याची संधी मला प्राप्त झाल्याचे सांगताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, कारगिलच्या भागात मी जोजिला बोगदा बांधत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा हा बोगदा आहे. ब‘ह्मपुत्रेवर आणि गंगा नदीवर प्रत्येकी 6 पूल मी बांधले. 1300 किमीचा मुंबई दिल्ली हा ग्रीन  एक्सप्रेस वे येत्या वर्षभरात पूर्ण होईल. गंगा शुध्दीकरण, जलमार्ग वाहतूक सुरु करणे अशी अनेक कामे माझ्या हातून झाली. तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनाच्या काळात मी 280 व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 80 कोटी लोकांशी संपर्क केला. 

सामाजिक क्षेत्रातही अनेक गरीब लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रकि‘या, अपंगांना कृत्रिम पाय लावून देण्यास मदत केली. अशा सेवांमध्येच मला आनंद असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले- रा. स्व. संघ, अभाविप आणि माझी आई यांनी दिलेल्या संस्कारातून मी घडलो. त्यांनी दिलेल्या संस्काराचा वारसा मला लाभला. विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्याचा मी भरपूर प्रयत्न केला, पण त्या कामात अजून पाहिजे तेवढे यश मिळाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. गावागावात आज परिस्थिती खूप खराब आहे. म्हणून गावांचा विकास करण्याचे मी ठरविले आहे. मागास क्षेत्र आणि शेतकरी यांचा आर्थिक व सामाजिक विकास झाला पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

अनेक अशक्य कल्पना शक्य व्हाव्यात यासाठी माझे काम सुरु असते, असे सांगताना नितीन गडकरी म्हणाले- शेतकर्याने निर्माण केलेल्या इंधनावर वाहने चालावी व हे शहर आणि देश प्रदूषणमुक्त व्हावे असे माझे प्रयत्न आहेत. देशासाठी, मातृभूमीसाठी काम करायचे. निधीची कमतरता नाही. फक्त इच्छाशक्ती हवी. देशाला सर्वच क्षेत्रात आम्ही खूप पुढे नेऊ शकतो. रा. स्व. संघ, विद्यार्थी परिषद, रा. से. समिती यांच्या शिकवणीतून संस्कार मिळतात व व्यक्तित्व निर्माण होते, या संस्कारांमुळेच मातृभूमीची आणि देशाची सेवा मी करू शकलो, असेही ते म्हणाले.

राजकारण करायचे ते रोजीरोटी कमावण्यासाठी नाही तर समाजसेवा करण्यासाठी असे सर्वच राजकारणी म्हणतात मात्र हे तत्व खऱ्या अर्थाने जीवनात अंगिकारणारे राजकीय नेते नितीन गडकरी आहेत अशा शब्दात  तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी नितीन गडकरींचा गौरव केला. गडकरी हे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेते आहेत असे सांगतांना  बनवारीलालजी म्हणाले की एका काळात गडकरी पक्षासाठी ११०० रुपयाची देणगी मागायचे आज ते ५० लाख कोटींशिवाय  बोलतच नाही. गडकरींना आपण अगदी तरुण असताना म्हणजेच नागपुरी भाषेत सांगायचे तर चड्डीत फिरताना पहिले  होते. आज मात्र ते देशातील सप्तर्षी म्हणजे प्रमुख सात नेत्यांपैकी एक आहेत. अशा शब्दात पुरोहित यांनी गडकरींचे कौतुक केले. 

यावेळी बनवारीलालजींनी व्यासपीठावर उपस्थित देवेंद्र फडणवीसांचेही कौतुक केले. देवेंद्र मी नावाचाच नाही तर खराखुरा पुरोहित आहे, त्यामुळे मी भविष्य सांगतो की तुमचे भविष्य उज्वल आहे लवकरच परिवर्तन नक्की आहे, तुमचे तारे  खूप चांगले आहेत अशा शब्दात त्यांनी फडणवीसांना दिलासाही दिला. 

सर्वसाधारणपणे राजकीय नेते अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात मात्र नितीन गडकरी हे अधिकाऱ्यांकडून आपल्या पद्धतीने काम करणारे  मंत्री आहेत अशा शब्दात विधानसभेचे  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी यांचा गौरव केला. जगातील अद्ययावत ज्ञान त्यांनी  भारतात आणून ते इथल्या चौकटीत बसवले आणि त्याचा वापर केला याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. 

प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर पदमगंधा प्रतिष्ठानच्या शुभांगी भडभडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांनी शाल, श्रीफळ, सन्मानपत्र स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गडकरी यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संगीता वाईकर यांनी केले. तर  संचालन  प्रभा देऊस्कर यांनी केले. कार्यक्रमाला मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.