वर्धेत पकडला ३० लाखाचा अवैध दारूसाठा

January 17,2021

वर्धा : १७ जानेवारी - समुद्रपूर तालुक्यातील गिरड कोरा रस्त्यावरील साखरा शिवारात पोलिसांनी सापळा रचून ३० लाख रुपये किमतीची अवैध दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. ही दारू नागपूरवरून चंद्रपूर जिल्ह्यात नेण्यात येत होती.

गिरडचे ठाणेदार महेंद्र सूर्यवंशी यांना एका ट्रकमध्ये नागपूरकडून चंद्रपूरला अवैध दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. साखरा शिवारात सापळा रचून गिरडकडून कोऱ्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकला थांबवून पाहणी केली असता विदेशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. सोबतच अक्षय नानाजी पोटफोडे (वय २६), कुंदन नामदेवराव खडसे (वय ३१), जोयाफ खा युसूफ खा (वय ३१) सर्व राहणार हिंगणघाट यांना ताब्यात घेतले. विदेशी दारूचा १८ लाख ८४ हजार रुपयांचा साठा, १२ लाखांचा ट्रक, मोबाइल आणि रोख असा ३० लाख ९९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींना विचारपूस केली असता ही दारू नागपूरवरून चंद्रपूरला नेत असल्याची माहिती दिली आहे. ही कारवाई गिरडचे ठाणेदार सूर्यवंशी, पोलिस कर्मचारी प्रमोद सोनोने, नरेंद्र बेलखेडे, रवी घाटुर्ले, राहुल मानकर, प्रशांत ठोंबरे, महेंद्र गिरी आदींनी केली