बंदुकीतून छर्रा मारत पत्नीला ठार करण्याचा केला प्रयत्न

January 17,2021

नागपूर : १७ जानेवारी - कौटुंबिक कलहातून पतीने फुगे फोडण्याच्या बंदुकीतून गळ्यावर छर्रा मारत शिक्षक पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना एमआयडीसीतील माधवनगर येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली.

किशोर हरिश्चंद्र रामटेके (वय ४७) असे अटकेतील पतीचे तर ज्योत्स्ना किशोर रामटेके (वय ४५, दोन्ही रा. माधवनगरी, इसासनी) असे जखमीचे नाव आहे. किशोर सार्वजिनक बांधकाम विभागात आरेखक (डिझायनर) म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००२मध्ये किशोरचे ज्योत्स्ना यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना मूलबाळ नसल्याने दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. तीन महिन्यांपूर्वी किशोरची गडचिरोली येथे बदली झाली. किशोरला दारूचे व्यसन लागले. तो नेहमी ज्योत्स्ना यांच्यासोबत वाद घालायचा. गुरुवारी दुपारी किशोर दारू पिऊन आला. त्याने ज्योत्स्ना यांच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला गेला. संतप्त किशोरने फुगे फोडण्याच्या बंदुकीतून ज्योत्स्ना यांच्या गळ्यावर छर्रा मारला. त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांनी आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी ज्योत्स्ना यांना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करून एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून किशोरला अटक केली.